जळगाव : चोरलेल्या बकऱ्या एमआयडीसीतील जनावरांच्या बाजारात विक्री करताना शनिवारी दोन महिलांना पोलीसांनी अटक केली. चोरलेल्या बकऱ्या मालकांनी व्हिडीओ कॉलींगद्वारे ओळखल्या आहे. सदर बकऱ्या बुलढाणाच्या मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथून चोरून आणलेचे समोर आले. दरम्यान, सहा बकऱ्या व दोघा महिलांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
जळगाव एमआयडीसीत दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. त्यात जनावरे, कोंबड्याही खेड्यांवरून विक्रीला येतात. शनिवारी दोन महिला बकऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. पोलिस नाईक अल्ताफ पठाण, विशाल कोळी यांना चोरीच्या बकऱ्या विक्रीला आल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांनी बाजारात जाऊन खात्री केली असता, त्यांना बकऱ्या विक्रीसाठी आलेल्या महिलांवर संशय आला.
डशा पांडुरंग काटे (वय ५०) व सपना रवीद्र गोंधळी (३२) या दोघी महिलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, तेथे बकऱ्या चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.