---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज लहान-मोठे अपघात होत असून, यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशात पुन्हा एक घटना समोर आली आहे, ज्यात अमोल आणि पृथ्वीराज या दोन तरुणांचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ऐन दिवाळीत आधार गमावल्याने दोन्ही कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल ज्ञानेश्वर पाटील (25) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील ( 23) असे मृत दोघांचे नाव आहे. ते दोघेही देवडीच्या खरेदीसाठी चोपडा शहरात आले होते.
दरम्यान, सर्व कामे आटोपून सायंकाळी (16 ऑक्टोबर ) गावी मामलदे येथे दुचाकीने निघाले, मात्र चोपडा-मामलदे फाटावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना कट मारला.
यात त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांना मृत घोषित केले.
ऐन दिवाळीत आधार गमावल्याने कुटुंबीयांना धक्का
अवघ्या काही दिवसात दिवाळी असून, हा आनंदात साजरा करण्यासाठी घराघरात जय्यत तयारी सुरु आहे. अमोल आणि पृथ्वीराज हे दोघे देखील देवडीच्या खरेदीसाठी चोपडा शहरात आले होते. मात्र, ऐन दिवाळी सारख्या सणापूरवी दोघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.