जळगाव : भरधाव पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत पाथरी येथील दोन तरुण ठार झाले. तर तिसरा गंभीर जखमी झाला. या घटनेची बातमी धडकताच पाथरी (ता. जळगाव) गावात शोककळा पसरली. गुरुवारी (१० एप्रिल) दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना वावडदानजीक घडली. भावेश गोरख पाटील (वय ३८) महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (वय ३८, दोन्ही रा. पाथरी) अशी मृतांची नावे आहेत. या तरुणांसोबतचा गावातील संदीप शांताराम भिल (वय ३५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पाथरी येथील हे तिघे जण कामानिमित्त जळगाव येथे दुचाकीने जाण्यासाठी निघाले होते. वावडदा गाव ओलांडत असताना समोरून भरधाव वेगातील पिकअपने या तरुणांच्या दुचाकीला जोराने धडक दिली. यात तिघे जागेवर बेशुद्ध पडले. ग्रामस्थांसह प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत या तिघा बेशुद्धावस्थेतील जखमींना तत्काळ वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.
ही वार्ता गावात धडकताच पाथरी गावात शोककळा पसरली. अनेकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी भावेश पाटील तसेच महेंद्र जाधव या तरुणांना मृत घोषित केले. दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयात कळताच कुटुंबीयांना जबर धक्का बसला. ग्रामस्थही शोकमग्न झाले. एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात मयतांवरील पंचनाम्याचे कामकाज सुरू केले.
या अपघातात पाथरी येथील तिसरा तरुण संदीप भिल याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भावेश पाटील हा लक्झरी बसवर चालक म्हणून कार्यरत होता. महेंद्र जाधव हा टेलरिंग काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील असा परिवार आहे. हे तिघे तरुण कष्टाळू, मेहनती असल्याने, दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.