आंबेडकरांमुळे उध्दव ठाकरे-शरद पवारांमध्ये दरार!

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. मात्र युती केल्यापासून मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत काही खटके उडताना दिसत आहेत. युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रीया देतांना माझी युती केवळ शिवसेनेसोबत आहे, इतरांशी मला काही देणेघेणे नाही, अशी स्पष्ट भुमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यामुळे आंबेडकरांमुळे उध्दव ठाकरे-शरद पवारांमधील संबंध खराब होण्याची चिन्हे आहेत.

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना ठाकरे गट आणि वंचित युतीवर प्रतिक्रिया दिली. ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का? या प्रश्‍नाचे उत्तर देतांना आंबेडकर म्हणाले की, तो मुद्दा मी ज्यावेळी स्पष्ट करायचा तेव्हा मी करेन, आता मी काही त्यावर बोलत नाही. मला जे बोलयाचे होते ते मी बोललो आहे. माझ्या पक्षाने काय बोलवे हे माझा पक्ष ठरवतो. आमच्या दृष्टीने जे आम्हाला मांडायचे होते, ते मांडून झालेले आहे. पुढचा काळ जसा जाईल त्यानुसार आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.