कोल्हापूर : पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या तसेच पक्ष फुटल्यानंतरही उध्दव ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या एका कट्टर शिवसैनिकाला खुद्द उध्दव ठाकरे यांनीच पदावरुन काढून टाकले आहे. कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव त्यांचे नाव असून जाधव यांच्या हकालपट्टीमुळे शिवसैनिकांमध्ये उध्दव ठाकरेंच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. पदावरुन त्यांना काढून टाकण्याचे कारण देखील शिवसैनिकांना पटलेले नाही. जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती.
दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यंची भेट घेतली होती. याला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी विरोध करत शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका, अशा शब्दांत विरोध केला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे.
2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे.
पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल, असे जाधव म्हणाले होते. यावरून ठाकरे यांनी जाधव यांच्यावरच हकालपट्टीची कारवाई केली आहे.