संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करणार्यांना माफी नाही, अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विरोधकांसोबत हातमिळवणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. अशी टीकाही नड्डा यांनी केली.
देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देत असतानाच महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या १८ जागांसाठीही भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला असून नियोजन म्हणून केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून देण्यात आले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप संघटनात्मक तयारी करीत आहे.
नड्डा यांच्याकडून एक चूक
संभाजीनगर सभेच्यावेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख बाळासाहेब देवरस यांचे नाव घेतले. आपल्या भाषणात नड्डा म्हणाले, ’ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्या विरोधात बाळासाहेब देवरस आयुष्यभर लढले त्यांना साथ दिली. स्वर्गीय देवरस हे आरएसएसचे तिसरे सरसंघचालक होते. यावरुन शिवसेनेने टीका केली आहे.
मराठवाड्यातील चारही जागा आमच्याच : भागवत कराड
भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार असल्याची चर्चा रंगलेली असताना औरंगाबादसह मराठवाड्यातील ४ जागांवर भाजपचे लक्ष असल्याचे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितले. औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चारही जागांवर भाजपने दावा केला आहे. या चारही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या औरंगाबाद दौर्यादरम्यान भागवत कराड यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.