मुंबई : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. शरद पवारांनी आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडली आहे. तर, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या चर्चांवरही पवारांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, असं पवार यांनी पुस्तकातील पान नंबर ४१७ वर लिहिले आहे.
यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय असं म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणार्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं असंही म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. मुंबई तोडण्याचा केंद्राचा कोणताही मानस नसल्याचं शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलंय. उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय. मुंबई तोडण्याची भीती दाखवून वर्षानुवर्षे बीएमसी लुटण्याचं काम केलं गेलंय. मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणार्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
मुंबई तोडण्याचा केंद्राचा कोणताही मानस नसल्याचं शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलंय….@PawarSpeaks
उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय. मुंबई तोडण्याची भीती दाखवून वर्षानुवर्षे #BMC लुटण्याचं काम केलं गेलंय.
मतांसाठी राजकीय पोळी भाजून…
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) May 4, 2023
शरद पवार यांनी पुस्तकात मांडलेल्या मतासंदर्भात उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ते म्हणाले की, ‘मी माझ्या मतावर ठाम आहे, मी माझी मतं यापुढेही ठामपणे मांडतच राहणार आहे. मात्र, महाविकास आघाडीला माझ्याकडून कुठेही तडा जाणार नाही, एवढी काळजी मी घेईन,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.