मुंबई : वादग्रस्त विधानामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अडचणीत सापडल्या आहेत. विरोधकांवर टीका करतांना त्या एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहेत. मात्र आता त्यांनी हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळेे उध्दव ठाकरे देखील चांगलेच अडणीत आले आहे. याचं कारण म्हणजे, सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही, अशी शपथ विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी घेतली असून त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
विरोधकांवर थेट आक्रमक हल्ला करणार्या सुषमा अंधारे अत्यंत कमी काळात शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्राण्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र सुषमा अंधारेंनी केलेल्या विधानांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगासागर समुद्र किनार्यावर शपथ घेत सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. मी आजपासून शपथ घेतो की, ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही अशा प्रकाराचा शेटे यांचा व्हिडिओ समोर आला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक वारकरी अशाप्रकारे शपथ घेतील असं शेटे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारकर्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आळंदीत वारकर्यांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
सुषमा अंधारे यांनी भाषणात जे विधान केले त्यामुळे वारकर्यांची भावना दुखावली असल्याचं बोललं जाते. आळंदी येथे वारकर्यांनी सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांना चपलेचा हार घातला. आळंदीचे युवा किर्तनकार महेश मडके पाटील यांच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनात वारकर्यांकडून अंधारे यांना उत्तर देण्यात आले. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा असा सल्ला वारकर्यांनी सुषमा अंधारेंना दिला.
सुषमा अंधारेंविरोधात तक्रार
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात सुषमा अंधारे यांचा हिंदू देवी-देवता आणि साधुसंताबद्दल वादग्रस्त विधानांची व्हिडिओ क्लीप व्हायरल होतेय. त्यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रभू राम, श्रीकृष्ण, संत ज्ञानदेव यांच्यावर अंधारे यांनी अवमानाजनक वक्तव्य केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.