रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये आज सभा होणार आहे. या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ही सभा कोकणातील रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असं सांगितलं जात आहे. तसेच कोकणाला दिशा देणारीही ही सभा असेल असा दावा केला जात आहे. गोळीबार मैदानात होणाऱ्या या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करारा जवाब देणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे, पत्रकार परिषदांचे व्हिडीओ दाखवून या सभेतून उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या लाव रे तो व्हिडीओ सांगणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पाच मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या ४० आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदेंची त्याच मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज उद्धव ठाकरेंवर कसा हल्लाबोल करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंच्या गोळीबार मैदानावरील सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर दिले जाणार आहे. ठाकरेंनी आजपर्यंत ‘शरद पवार’ यांच्यासह काँग्रेसवर केलेल्या टिकेचे व्हिडिओ लावून ठाकरेंना केलेल्या विधानांची आठवण शिवसेनेकडून करून दिली जाणार आहे.
तसेच ठाकरेंनी कोकणाकडे कसे दुर्लक्ष केलं, ठाकरेंना सोडून का ४० आमदार गेले याचं स्पष्टीकरण ही याच सभेच्या मंचावरून कोकणवासियांना दिलं जाणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभेला गोळीबार मैदानातील सभेतून ‘करारा जबाब’ दिला जाणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवर दोन्ही बाजूला शिवसेना नेत्यांचे स्वागत फलक व भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच शहरातील गोळीबार मैदानावर होत असलेल्या सभेची तयारी आता पूर्ण झाली असून सभेचे व्यासपीठ व मैदानातील आसनव्यवस्था देखील आता पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही सभा आत्तापर्यंतची रेकॉर्डब्रेक सभा होणार असल्याचे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.