मुंबई । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर पार पडणार असून मात्र या शिबिराआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॅाट रिचेबल असल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे.
विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांचा फोन नॉट रिचेबल असल्यामुळे मनिषा कायंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनिषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करु शकतात, असाही अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, आगामी महापालिकेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्यानं ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.