उद्धव ठाकरेंना पंतप्रधानकीचे डोहाळे

प्रासंगिक

 

– मोरेश्वर बडगे

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना नको नको ती स्वप्नं पडायला लागली आहेत. महाआघाडी म्हणजे अल्लाउद्दिनचा दिवा सापडल्यासारखा त्यांचा जोश आहे.

देशात बदल घडवण्याचा लोकांचा मूड दिसतो. एकत्र या असे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणाले. काय गंमत आहे पहा. आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण केले ते शरद पवार महाआघाडीच्या एकजुटीवर बोलू लागले आहेत. एकजूट झालो तर मुख्यमंत्री, पंतप्रधान आपलाच असे या विरोधकांचे गणित आहे. ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी तर पंतप्रधानपदासाठी Uddhav Thackeray उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे, असे सांगून खळबळ उडवून दिली. भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची पालखी नाचवणेही सुरू झाले आहे. सारा माल घरात. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. शरद पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री केले, तेच पंतप्रधान बनवतील अशा हवेत उद्धव आहेत. पवार त्यांना अजूनही समजलेले नाहीत, असेच म्हणावे लागेल.

तुम्ही लिहून ठेवा, उद्धव ठाकरे आता काहीही बनू शकणार नाहीत. शरद पवारांनी त्यांना संपवले आहे. भाजपसोबत राहिले असते तर ठाकूरकी राहिली असती. पण मुख्यमंत्री व्हायचा मोह झाला आणि सत्यानाश करून घेतला. अडीच वर्षांत पवारांनी उद्धव यांना रस्त्यावर आणून सोडले. घराबाहेर न निघणारे उद्धव आता गल्लोगल्ली फिरत छाती बडवून घेत आहेत. मात्र आता उरलंय काय? उद्धव यांची शिल्लक सेना आता तर राष्ट्रवादीची शिवसेना झाली आहे. कितीही स्वाभिमानाच्या गप्पा मारत असले तरी आता ते दोन काँग्रेसचे गुलाम झाले आहेत. त्यांना स्वतःहून काही करता येणार नाही. महाआघाडीच्या पिंजऱ्यात बंद झाले आहेत. महाआघाडी देईल तेवढ्याच जागांवर निवडणुका लढता येतील. पवारांमागे फरफटत जाणे एवढेच आता त्यांच्यासाठी लिहिले आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. खेडच्या सभेत त्याची झलक दिसली. पवारांनी घुसवलेली माणसे भारी पडत आहेत. सुषमा अंधारे आपले भाषण आटपायला तयार नव्हत्या. Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांना ताटकळत बसावे लागले. युतीत आम्ही —- वर्षे सडलो, असे भाजपला सोडताना उद्धव म्हणाले होते. आता अडीच वर्षांतच ते सडले आहेत; पण बोलायची सोय नाही. असंगाशी संग कसा महागात पडतो, त्याचा हा नमुना! एकेकाळी हिंदुत्वाचा आवाज होती ठाकरे आणि त्यांची सेना. मात्र, आज संभाजीनगर झाल्याचा आनंदही मोकळेपणाने साजरा करू शकत नाही.

कुठल्या माणसाच्या सापळ्यात अडकले Uddhav Thackeray उद्धव ठाकरे? शरद पवारांना सत्तेशिवाय दुसरे काही सुचत नाही. ५० वर्षांच्या आयुष्यात पवारांनी खूप कोलांटउड्या मारल्या. ४० आमदारांनी बंड केले म्हणून उद्धव त्यांना गद्दार म्हणत आहेत. पण उद्धव ज्यांच्या सावलीत गेले आहेत त्या पवारांनी किती बंड केले, त्याचे काय? १९७८ मध्ये वसंतदादांचे सरकार पाडून पवार मुख्यमंत्री बनले होते. पुढे १९९९ मध्ये सोनिया गांधी विदेशी आहेत, असे सांगून त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली. पुढे याच सोनियांच्या हाताखाली कृषिमंत्री म्हणून काम केले. २५ वर्षे उलटूनही पवार पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आता आयुष्याच्या संध्याकाळी मिळेल त्या पक्षासोबत आघाडी करून प्रकाशझोतात राहायचे, एवढेच त्यांच्या नशिबी आहे. महाराष्ट्र धड सांभाळता येत नाही आणि पवार नागालँडमध्ये हातपाय मारू पाहतात. तिथे सात आमदार काय निवडून आले, तिथल्या सरकारमध्ये घुसले. देशभर भाजपला विरोध करायचा आणि नागालँडमध्ये गरज नसताना भाजपप्रणीत सरकारमध्ये घुसायचे. तिथल्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठिंबा आहे. भाजपला नाही असे चक्रावणारे स्पष्टीकरणही पवारांनी दिले. पवारांचा हा दुटप्पीपणा आहे. तिथे त्यांना विरोधी पक्षाची भूमिका बजावता आली असती. पण पवार म्हणजे जिधर बम, उधर हम! विचारधारा वगैरे त्यांच्यासाठी बोलायच्या गोष्टी. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्यासाठी विरोधकांना एकजुटीचे पवारांचे आवाहन हेही शुद्ध ढोंग आहे. पवार आपल्याला चालवतील म्हणून उद्धव नवी स्वप्नं पाहत असतील तर तेही होणे नाही. उद्धव यांना पुढे केले तर इतर नेते काय बटाटे सोलतील? ममता, नितीशकुमार, केसीआर, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल पाण्यात देव बुडवून बसले आहेत. सोबत काँग्रेस आल्याशिवाय विरोधी ऐक्य शक्य नाही. काँग्रेस केव्हा येईल? राहुलबाबाचे नेतृत्व मान्य कराल तरच ते शक्य आहे. ते होणे नाही. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य हे मृगजळ आहे. समाजवादी पक्षाने तर स्वबळावर लढण्याचे आताच जाहीरही करून टाकले आहे. अमेठी आम्ही लढवू असे अखिलेश यादव नुकतेच म्हणाले. देशभर सुरू आहे तेच महाराष्ट्रात होईल. प्रकाश आंबेडकर की शरद पवार यातून एकाची निवड उद्धव यांना करावी लागेल. राज ठाकरे आणि उद्धव हे भाऊ जसे एकत्र येणे शक्य नाही तसे प्रकाश आंबेडकर आणि पवार यांचे आहे. तिकडे नाना पटोले सुरुवातीपासून स्वबळाचा नारा देत आहेत. महाआघाडी ही पुढच्या वर्षी महाबिघाडी झालेली दिसेल.

राहिला विषय पंतप्रधान कोण? नशिबाची साथ असेल आणि परिस्थिती अनुकूल असेल तर कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. १० वर्षांपूर्वी आघाड्यांचे युग होते. फक्त ८० खासदारांचा पाठिंबा असताना देवेगौडा पंतप्रधान झाले. चरण सिंग, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता; पण पंतप्रधान झाले. आपल्याकडे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे दोन मराठी नेते पंतप्रधान होऊ शकले असते. मात्र, यशवंतरावांनी उशिराने दावा ठोकला तेव्हा इंदिरा गांधी यांच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या होत्या. त्यामुळे यशवंतराव मागे पडले. पवारांनी स्वतःच्या अविश्वसनीय प्रतिमेमुळे मार खाल्ला. दिल्लीत टिकले असते तर आज पवार कुठल्या कुठे असते. आता पवारच काय, कोणासाठीही जागा नाही. २०२४ चे बुकिंग फुल्ल आहे आणि ते नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहे. लिहून ठेवा, गेल्या दोन निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा भाजप अधिक जागा जिंकेल आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसतील. गेल्या म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३७ टक्के मते आणि ३०३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे मतदान होते फक्त १९.५ टक्के. यावेळी तर भाजपचे मतदान वाढणार आहे. कारण मोदींना टक्कर देऊ शकेल असे नेतृत्वच विरोधकांकडे नाही. सामान्य माणूस रिझल्ट पाहतो आहे. मोदी नाही तर कोण? या प्रश्नाचे उत्तर मोदीच असे मिळते.