उकाडा आणखी वाढणार; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अनेक जिल्ह्यांच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला असून आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने कमाल तापमानात वाढ होईल त्याचबरोबर महाराष्ट्रात आज उष्ण कोरडं हवामान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.  राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. जळगावमध्ये पारा ४४.६ अंशावर पोहोचला होता. या वर्षीचे हे राज्यातील सर्वोच्च तापमान ठरलं आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनचं उन्हाचा चटका बसत आहे. दुपारी बारा नंतर तापमानाचा पारा ४० अंशावर जात असल्याने जळगावकर  चांगलेच हैराण झाले आहेत.

दरम्यान, आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.