युक्रेन युद्धात पाकिस्तान!

दिल्ली दिनांक

– रवींद्र दाणी

युक्रेन युद्ध (Ukraine war) दुसर्‍या वर्षात गेले असताना, त्याला एक नवा पैलू लाभला आहे. पाकिस्तान! पाकिस्तानचा शेजारी इराण रशियाला युद्धसामुग्री पुरवीत असताना, पाकिस्तानने अचानक युक्रेनला रॉकेट लाँचर्स पुरविण्याचा निर्णय घेतला. या रॉकेट लाँचर्सची पहिली खेप युक्रेनला रवाना करण्यात आली आहे.

चीनने झटकले ?

पाकिस्तानने अचानक घेतलेल्या या निर्णयाचा अर्थ काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीत आहे. चीन त्याला फार मदत करण्याच्या स्थितीत आणि मन:स्थितीत नाही. चीनने तर श्रीलंकेलाही झुरळासारखे झटकले आहे. श्रीलंकेला आर्थिक मदत देण्यास चीन तयार नाही. लंकेची आर्थिक स्थिती फार खालावली आहे. चीनने लंकेशी फक्त सामरिक संबंध ठेवले आहेत. काही महिन्यांपूर्वी चीनचे एक टेहळणी जहाज श्रीलंकेच्या एका बंदरावर थांबले होते. श्रीलंकेने या जहाजास परवानगी देऊ नये असे भारताने सुचविले होते. पण, भारताची ही सूचना डावलून श्रीलंकेने चीनला खुष करण्यासाठी त्याच्या जहाजाला आपल्या बंदरात नांगर टाकू दिला. मात्र, ही चीननिष्ठाही श्रीलंकेला तारू शकली नाही. तसेच पाकिस्तानचे होत असावे. (Ukraine war) पाकिस्तान-चीन यांना एकत्र बांधणारा चायना-पाकिस्तान एकॉनॉमिक कॉरिडोर- ‘सीपीईसी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. तरीही पाकिस्तानला यापेक्षा अधिक काही देण्याची चीनची तयारी दिसत नाही. मधल्या काळात पाकिस्तानने रशियाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला.

एक योगायोग म्हणजे युक्रेन युद्ध (Ukraine war) सुरू होण्याच्या दिवशी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम‘ान खान मॉस्कोत होते. चीन-रशियाच्या नादी लागून आपले भले होणार नाही हे आता पाकिस्तानच्या बहुधा लक्षात आले असावे. त्याला आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे पॅकेज हवे आहे. तो सध्या स्वत:ची अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. आता त्याला मनमोहनसिंग आठवत आहेत. भारताने मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री- पंतप्रधान केल्याने भारत चांगल्या स्थितीत आहे, आम्ही ते केले नाही अशी कबुली पाक नेते देत आहेत. पाकिस्तानला आज अमेरिका व आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यांच्या पॅकेजची नितांत आवश्यकता आहे. यातूनच अमेरिकेला खुष करण्यासाठी त्याने युक्रेनला रॉकेट लाँचर्स पुरविण्याचा हा निर्णय घेतला आहे असे सांगितले जात आहे. हा युक्तिवाद खरा असल्यास पुन्हा एकदा अमेरिका-पाकिस्तान मैत्रीचे युग सुरू झाल्याचा निष्कर्ष काढला जाईल.

युद्धाचा ताळेबंद

वर्षभरापूर्वी 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेन युद्ध (Ukraine war) सुरू झाले तेव्हा किती दिवसांत युक्रेनचा पाडाव होणार एवढाच प्रश्न विचारला जात होता. वर्षभरात रशियाला फार काही करता आले नाही. कडाक्याचा हिवाळा ओसरल्यानंतर रशियाने पुन्हा एकदा आक‘मक भूमिका घेतली असली तरी त्याला युक्रेन पादाक्रांत करता आलेले नाही.

नाटो बळकट

दुसर्‍या महायुद्धानंतर (Ukraine war) तत्कालीन सोवियत युनियनला आटोक्यात ठेवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने नॉर्थ एटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन -‘नाटो’ ही संघटना अस्तित्वात आली. पण, तिचे अस्तित्व तसे कमी कमी होत होते. नाटोला जागतिक महत्त्व कधी मिळाले नाही. आज नाटो ही एक ताकद झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक‘मणानंतर नाटोची कसोटी लागली. आणि या परीक्षेत नाटो उत्तीर्ण झाली असे म्हणता येईल. नाटोने केवळ एकजूट दाखविली नाही तर तिचा विस्तार झाला. रशियाचा हा खरा पराभव मानला जातो.

युरोपच्या हालअपेष्टा

युरोपातील काही प्रमुख देशांच्या इंधनाची तोटी रशियाच्या हाती होती. नार्ड स्ट्रिम- 2 या नावाने ओळखली जाणारी आणि बाल्टिक समुद्राखालून जाणारी ही गॅस पाईप लाईन रशियाने बंद केली. याने युरोप कोलमडून पडेल असा रशियाचा कयास होता. एकीकडे इंधनाची कमतरता आणि दुसरीकडे थंडीचा तडाखा याने त्या त्या देशातील जनता आपापल्या सरकारांविरुद्ध आंदोलन करील आणि नाटो थंड होईल असे राष्ट्रपती पुतिन यांना वाटत होते. ते झाले नाही. युरोपातील अनेक देशांनी थंडीचा सामना केला. इंधनासाठी जादा दर मोजला पण, (Ukraine war) युरोप युक्रेनच्या पाठीशी उभा ठाकला. कारण, ‘आज युक्रेन, उद्या आपण’ हे युरोपातील देशांना दिसत होते. यातून रशियाच्या विरोधात ही एकजूट तयार झाली.

रशियाने नार्ड – स्ट्रिम गॅस पाईप लाईन बंद केल्याने इंधनाचे दर एवढे वाढले की युरोपातील नागरिकांसमोर ‘इटिंग की हिटिंग’ म्हणजे पोट गरम ठेवायचे की शरीराला गरम ठेवायचे असे संकट उभे ठाकले. आता थंडीचा तडाखा कमी झाल्याने या नागरिकांचे जीवन जरा सुकर होत आहे.

जनरल डिसेंबर

दुसर्‍या महायुद्धात जर्मनीला रशियात पराभव पत्करावा लागला. सार्‍या युरोपात दबदबा निर्माण करणार्‍या हिटलरच्या फौजांना रशियात माघार घ्यावी लागली. कारण, हिटलर व त्यांच्या सेनापतींचा एक अंदाज चुकला होता. (Ukraine war) जर्मन सैन्याचा पराभव रशियाने नाही तर ‘जनरल डिसेंबर’ यांनी केला असे नंतर म्हटले गेले. डिसेंबरातील जीवघेण्या थंडीचा अंदाज हिटलर व त्याच्या सेनापतींना करता आला नाही. याची मोठी किंमत हिटलरला मोजावी लागली. आज तीच स्थिती राष्ट्रपती पुतिन यांची झाली आहे. त्यांना युरोपच्या एकजुटीचा अंदाज करता आला नाही. फिनलॅण्डसार‘या लहानशा, रशियाची सीमा असलेल्या, देशानेही नाटोत जाण्याचा निर्णय घेतला.

इराणचा पाठिंबा

युक्रेन युद्धात (Ukraine war) एकाकी पडलेल्या रशियाला चीनचा पाठिंबा असला तरी चीन फार मदत करीत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. चीनने रशियाची आर्थिक आघाडी चालू ठेवली आहे. अमेरिका व युरोपातील देशांनी रशियाची आर्थिक नाकेबंदी केली. या बाबतीत चीन रशियाच्या बाजूने उभा ठाकला. मात्र यापेक्षा त्याने अधिक काही केलेले नाही. मग, रशियाला युद्धसामुग्रीसाठी इराणसार‘या देशावर अवलंबून राहावे लागले. इराणने पुरविलेली काही शस्त्रास्त्रे रशियाला वापरावी लागली. कारण, स्वत: रशियाचे शस्त्रउत्पादन मंदावले आहे.

शेवट काय?

युक्रेन युद्ध (Ukraine war) कशावर जाऊन थांबेल याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रपती पुतिन यांनी आपले सर्वस्व या युद्धात पणास लावले आहे. हीच स्थिती युक्रेनची आहे. दररोज नवी नवी शस्त्रास्त्रे या युद्धात दाखल होत आहेत. याने युद्धाची दाहकता आणि भयावहता वाढत आहे.

तीन लाख ठार

एका वर्षापासून सुरू असलेल्या (Ukraine war) युक्रेन युद्धात जवळपास दोन लाख लोक ठार झाल्याचे मानले जाते. यात रशियाच्या एक लाखावर सैनिकांचा समावेश आहे. रशियाने आपले निम्मे रणगाडे या युद्धात गमावले आहेत. याशिवाय 286 विमाने, 276 हेलिकॉप्टर्स, 4877 चिलखती गाड्या त्याने गमावल्या. युक्रेनने 75 हजार सैनिक गमावले. 25 हजारावर नागरिक मरण पावले. बरीच लढाऊ विमाने, रणगाडे गमावले. युक्रेनचे झालेले मोठे नुकसान म्हणजे रस्ते, इमारती, वीज केंद्रे या बाबी जमीनदोस्त झाल्या आहेत. राष्ट्रपती पुतिन यांना या युद्धात काहीच मिळविता आले नाही. एका जागतिक महासत्तेचा नेता ही जी त्यांची प्रतिमा होती, ती गेली. आणि त्यांची अवस्था झाली- ‘प्यादे से पिट गया वजीर’!