युक्रेन युद्धाने जग दुभंगले!

दिल्ली दिनांक

– रवींद्र दाणी

युक्रेन युद्धात (Ukraine war) केवळ या देशातील इमारती भंगल्या- दुभंगल्या नाहीत तर सारे जग दुभंगले गेले आहे.

नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी जी- 20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीत दुभंगलेल्या जगाचे चित्र उमटले. युक्रेन युद्धामुळे एकीकडे रशिया- चीन आणि दुसरीकडे अमेरिका- युरोप यांच्यात निमार्ंण झालेल्या तणावाची परिणती म्हणजे या बैठकीनंतर कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही. कारण, जी-20 देशाच्या संयुक्त निवेदनात (Ukraine war) युक्रेन युद्धाचा, रशियाच्या आक्रमणाचा उल्लेख व्हावा अशी अमेरिका व युरोपातील देशांची भूमिका होती तर रशिया- चीनचा यास विरेाध होता. आणि यजमान भारताला या दोन्ही गटांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रयत्न करावे लागले. परिणामी कोणतेही निवेदन जारी करण्यात आले नाही.

जपानचा अपवाद

जी-20 देशांची मुख्य परिषद सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीत होणार आहे. त्यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक आयोजिण्यात आली होती. फक्त जपानचा अपवाद वगळता अन्य सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या बैठकीस हजेरी लावली होती. जपानने अंतर्गत कारणांमुळे बैठकीस न येण्याचा निर्णय घेतला होता.

9 मिनिटांची भेट

नवी दिल्ली बैठकीच्या निमित्ताने अमेरिका व रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक भेट झाली. (Ukraine war) युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट होती. उभय नेत्यांची भेट सामान्य झाल्याचे सांगितले गेले असले तरी त्यात युक्रेन वगळता अन्य कोणत्याही मुद्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले गेले. केवळ 9 मिनिटे झालेल्या या भेटीचा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी उल्लेखही केला नाही. नवी दिल्ली बैठकीसाठी आलेल्या अन्य काही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी ब्लिंकन यांची चर्चा केली. मात्र त्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लव्हरोव यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेखही नव्हता हे विशेष. बैठकीच्या एका सत्रात लव्हरोव यांनी, युक्रेनने आमच्यावर आक’मण केले असून, आम्ही केवळ ते परतावून लावीत आहोत असे म्हणताच बैठकीत हास्य उमटले. अर्थात उपरोधाचे.

जर्मनी आक्रमक

जी-20 देशांच्या या बैठकीत जर्मनीने फार आक्रमक भूमिका घेतली होती. रशियाचा उल्लेख ‘आक्रमक’ म्हणून करण्यात यावा असे प्रतिपादन जर्मनीचे परराष्ट्र मंत्री वारंवार करीत होते. (Ukraine war) दुसर्‍या महायुद्धात रशियाने जर्मनीला पराभूत केले होते. त्याची सल अद्याप या देशाच्या मनात सलत असावी आणि त्याची ही प्रतिक्रिया असल्याचे मानले जाते.

मोठी खाई

नवी दिल्लीतील बैठकीत जी-20 देशांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे असे प्रयत्न भारताने केले. पण, अमेरिका व रशिया या दोन गटांच्या भूमिकांमध्ये एवढी खाई निर्माण झाली आहे की आम्हाला या दोन्ही गटांना एकत्र आणणे शक्य झाले नाही अशी प्रांजळ कबुली भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी नंतर दिली.

चार दिग्गज!

जी-20 देशांमध्ये जगातील 19 श्रीमंत व मोठी राष्ट्रे असून, जगाच्या एकूण आर्थिक उलाढालीपैकी 85 टक्के उलाढाली या 19 देशांमध्ये होत असतात आणि त्यांची एकूण लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे. यावरून जी-20 चे महत्त्व लक्षात येईल. जगातील सर्वात मोठा भूभाग असलेला रशिया, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन, सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली अमेरिका हे चार दिग्गज देश या गटात आहेत.

युक्रेनला साथ देणार

अमेरिका व युरोपातील देश युक्रेनच्या बाजूने ठामपणे उभे आहेत आणि यापुढेही उभे राहणार आहेत. यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. रशियाचे आक्रमण संपेपर्यंत आम्ही (Ukraine war) युक्रेनला साथ देणार आहोत, असे ब्लिंकन यांनी सांगितले आहे तर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, अमेरिका व युरोपातील देश सौदेबाजीचे राजकारण करीत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना लव्हरोव यांनी फार कडक भाषा वापरली. ”आम्ही सभ्यतेची भाषा बोलतो. मात्र, पाश्चिमात्य देशातील आमच्या मित्रांचा याचा विसर पडला आहे. त्यांचा आता मुत्सद्देगिरीवर विश्वास राहिलेला नाही. ते आता सौदेबाजी व धमकीची भाषा बोलू लागले आहेत”, असे प्रतिपादन लव्हरोव यांनी केले.

मोदींचे प्रतिपादन

अमेरिका व रशिया यांच्या या वादात भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. जागतिक दुफळीमुळे जगाच्या विकासात धोका निर्माण होण्याची शक्यता तयार होत आहे, असे प्रतिपादन करताना मोदी यांनी, (Ukraine war) युक्रेन युद्धाचा थेट उल्लेख केला नसला तरी जागतिक राजकारणातील तणावाचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

भारत तटस्थ

भारताने रशियाच्या आक’मणाचा निषेध करावा अशी भूमिका अमेरिका व युरोपातील काही देशांनी घेतली असली तरी भारताने ते केलेले नाही. मागील काही दशकांची भारत-रशिया मैत्री हे याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. संयुक्त राष्ट्रात वेळोवेळी झालेल्या चर्चेत भारताने या (Ukraine war) युद्धाच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी त्याने रशियाच्या विरोधात मतदान केलेले नाही. कारण, रशियाने आजवर भारताच्या विरोधात मतदान केलेले नाही. भारताने रशियाच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी असे अमेरिकेला वाटत असले तरी भारत-रशिया गाढ संबंधाचा प्रदीर्घ इतिहास पाहता भारत हे करील असे वाटत नाही. भारताने रशियाच्या विरोधात न जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारताची संरक्षण खरेदी रशियातून होत आली आहे. एकेकाळी भारताची 70 टक्के संरक्षण खरेदी रशियातून होत असे. आता हे प्रमाण 49 टक्क्यांवर आले आहे. या बदल्यात रशियाने वेळोवेळी भारताला मदत केली आहे. याचा विचार करता भारत मास्कोवर टीका करू शकत नाही, असे मानले जाते.

सप्टेंबरपूर्वी….

1999 मध्ये स्थापन झालेल्या जी-20 चे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 रोजी एका वर्षासाठी भारताकडे आले. जी-20 मध्ये 19 देश आहेत आणि 20 वा सदस्य म्हणजे युरोपियन युनियन. मावळता अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष व भावी अध्यक्ष असे तिघे जी-20 चे संचालन करीत असतात. सप्टेंबर महिन्यात होणार्‍या मुख्य बैठकीची दोन आघाड्यांवर तयारी केली जात आहे. एक म्हणजे नवी दिल्लीच्या काही भागाला नवे रूप दिले जात आहे. रस्त्यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतासमोरील मुख्य आव्हान (Ukraine war) युक्रेन युद्धामुळे दुभंगलेल्या जगाला पुन्हा कसे सांधावयाचे हे आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत गतिरोधाची जी स्थिती तयार झाली ती मुख्य बैठकीत होऊ नये याची भारताला चिंता आहे. तोपर्यंत युक्रेन युद्धाचा काही तरी निकाल लागावा अशी भारताची इच्छा आहे.

युक्रेन युद्ध (Ukraine war) सुरू राहिल्यास वा ते अधिक भडकल्यास त्याचा भडका सप्टेंबरमध्ये होणार्‍या बैठकीतही उडू शकतो याची भारताला कल्पना आहे. तो टाळण्यासाठी भारताला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. युद्ध संपविणे तर भारताच्या हाती नाही, मात्र युक्रेन युद्धावरून जी-20 देशांमध्ये ‘मुत्सद्देगिरीचे युद्ध’ होऊ नये हे टाळणे भारताच्या हाती आहे. भारताकडून त्याचेच प्रयत्न सप्टेंबर बैठकीपर्यंत केले जाणार आहेत.