मुंबई : टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या प्रदर्शनात आलेली मरगळ अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये अपयशी कामगिरीमुळे संघातील प्रमुख खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. कर्णधार रोहित शर्माही याला अपवाद नाही. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्यात रोहित शर्माचा फॉर्मची कमतरता पुन्हा समोर आली आहे.
पहिल्या डावात रोहितला फक्त 3 धावांवरच समाधान मानावं लागलं. उमर नझीर या 6 फूट 4 इंच उंचीच्या गोलंदाजाने त्याला चाचपडायला लावलं. उमरने प्रत्येक चेंडूवर रोहितला अडचणीत आणत त्याची विकेट घेतली. मात्र, त्यानंतर उमरने कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. सामन्यानंतर उमर म्हणाला, “मी रोहित शर्माचा खूप मोठा चाहता आहे. त्याची विकेट घेणे माझ्यासाठी खूप खास आहे. म्हणूनच मी सेलिब्रेशन केले नाही.”
रोहितने दुसऱ्या डावात काहीसा सरस खेळ केला आणि 28 धावा केल्या. त्याने त्याचा ट्रेडमार्क पुल शॉट मारत स्क्वेअर लेगला षटकार ठोकला. मात्र, जम्मू-काश्मीरच्या आबिद मुश्ताकने त्याला बाद करत त्याचा डाव संपवला. विकेटवर ओलावा नसल्यामुळे गोलंदाजांना काहीसा संघर्ष करावा लागला, पण रोहित मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
कसोटीत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहितच्या खराब फॉर्ममुळे क्रीडाप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. जर चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याचं प्रदर्शन असंच राहिलं, तर त्याच्या कारकिर्दीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियासाठी हे वळण निर्णायक ठरणार आहे. कारण रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूला संघासाठी योगदान देणं गरजेचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याने आपला फॉर्म सुधारणं संघाच्या विजयासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.