Ranji Trophy 2025 : हिटमॅनसह मुंबईला उमर नजीरचा झटका; पॅट कमिन्ससारखी खेळली ‘खेळी’

मुंबई: खराब कामगिरीशी झुंज देणाऱ्या रोहित शर्माने तब्बल आठ वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत पुनरागमन केले, पण त्याला पहिल्याच सामन्यात निराशा पत्करावी लागली. BKC मैदानावर जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळताना रोहित केवळ १९ चेंडूत ३ धावा करून माघारी परतला. प्रेक्षकांनी हिटमॅनच्या दमदार खेळाची अपेक्षा धरली होती, पण त्यांना निराशा पदरी पडली.

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमर नजीर मीर याने भन्नाट गोलंदाजीसह रोहितला अक्षरशः नाचवलं. ६.४ फूट उंच असलेल्या उमरने आपल्या वेगवान चेंडू, अचूक बाऊन्सर आणि शरीरावर केलेल्या माऱ्यामुळे रोहितला अडचणीत आणले. अखेरीस, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्न कसोटीत जसा रोहितला बाद केले होते, अगदी तसेच उमरने त्याला बाद केले.

रोहित शर्माचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रम

रोहित शर्माने रणजी करंडकात शेवटचा सामना २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता, जिथे त्याने ११३ धावांची दमदार खेळी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २०८ सामन्यांत ९,२८७ धावा केल्या असून त्यात २९ शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. ३०९ नाबाद ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यामुळे रोहित जम्मू-काश्मीरविरुद्ध पुन्हा काहीतरी खास खेळी करेल, अशी अपेक्षा होती.

उमर नजीर मीरचा तडाखा

उमर नजीर मीरने फक्त रोहितलाच नाही, तर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (१२) आणि हार्दिक तामोरे (७) यांनाही माघारी पाठवले. मुंबईला ४१ धावांवर चार मोठे धक्के बसले. उमरच्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं.

उमर नजीर मीर कोण आहे?

१४० किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकणारा उमर नजीर मीर हा पुलवामा, दक्षिण काश्मीरचा आहे. तो मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला असून त्याचे वडील लाकूड व्यवसायात आहेत. उमरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५७ सामन्यांत १३८ विकेट घेतल्या आहेत आणि ९ ट्वेंटी-२० सामन्यांत ९ विकेट घेतल्या आहेत.

ऐतिहासिक कामगिरी

उमरने याआधी आसामविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात एका डावात ९ विकेट घेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तो जम्मू-काश्मीरसाठी एका डावात ९ विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

पुढील सामना निर्णायक

रोहित शर्माला खराब फॉर्ममुळे गेल्या काही महिन्यांपासून कसोटीतही संघर्ष करावा लागला आहे. रणजी करंडकातील आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, अन्यथा त्याच्यावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.