पुणे : उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अतिक अहमद याचा मुलगा असद याचे एनकाऊन्टर करण्यात आले. असदचा अनेक दिवस पुणे शहरात मुक्काम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तो गेल्या २५ दिवसांपासून फरार होता. त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते. अखेर असद आणि शूटर गुलामला एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले. या २५ दिवसांमध्ये असीद कुठे होता, त्याची व्यवस्था कोणी केली? याची चौकशी पोलिसांनी सुरु केली. त्यातून धक्कादायक ही माहिती मिळाली आहे.
असद आणि गुलाम यांना काही दिवस पुण्यात सुरक्षित ठेवण्यात आले होते. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर पुण्यात शोध मोहीम सुरु झाली आहे. दरम्यान, आतिकचा भाऊ अशरफ आणि इंटरनॅशनल डॉन अबू सालेम यांचे चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे असद आणि गुलामला पुण्यात सालेमच्या जवळच्या लोकांसोबत राहण्याची व्यवस्था केली गेली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम तुरुंगात आहे. त्याचे नेटवर्क महाराष्ट्रात अजूनही सक्रिय आहे. अबू सालेमच्या सांगण्यावरुन अश्रफला पुण्यात आश्रय दिला गेला होता, अशी माहिती आहे. आता पुणे पोलीस अन् महाराष्ट्र एटीएस सक्रीय झाले आहे. अबू सालेम याचे पुण्यातील नेटवर्क शोधण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांत या प्रकरणात पुण्यातील काही लोकांना अटक होणार आहे.