ब्रेकिंग न्यूज : पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटवले

कोल्हापूर : पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले आहे. गुप्तता पाळत रात्रीतून ही कारवाई करण्यात आलेली आहे. कोल्हापुरातल्या पावनगडावर मागच्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचे प्रकार वाढले होते. अनधिकृतपणे मदरसे उभारण्यात आलेले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला विशेष महत्त्व आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर त्या अतिक्रमणावर प्रशासनाचा हतोडा पडला आहे. पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी नऊ वाजता संपली. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाच्या अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहे. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दरम्यान, पावनगड परिसरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मदरशामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मुले शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या मदरशातील मुलांना हलवण्यात आले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.