तरुण भारत लाईव्ह । पुणे : पुण्याची ओळख असलेल्या पर्वती टेकडीवर मजार बांधून याठिकाणची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याठिकाणी दैनंदिन पुजाअर्चा देखील सुरु करण्यात आलेली असून काही जागरुक नागरिकांनी हा प्रकार समाजमाध्यमातून उघडकीस आणला. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली आहे. श्री देवदेवेश्वर संस्थान, पोलीस, महानगरपालिका अधिकारी, वनविभागाचे अधिकारी असे एकत्रित या ठिकाणाची पाहणी करणार आहेत.
पर्वती टेकडी चढायला सुरुवात केल्यानंतर दहा ते बारा पायर्या चढून गेल्यानंतर ही मजार लागते. टेकडीवर असलेल्या मोकळ्या ओपन जीमच्या जागेत ही मजार आहे. या मजारीभोवती ओट्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधून माहिती कळविली. त्यानंतर, मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन पोलिसात तक्रार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, हरिष परदेशी आणि त्यांचे कार्यक्रते जागेवर गेले.
दरम्यान, भाजपाचे प्रभारी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी देखील दत्तवाडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. पर्वती परिसरातील एका अनधिकृत थडग्याचा (मजार) विषय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पायगुडे यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. अनधिकृतपणे काही घडू नये, यासाठी पोलिसांनी या विषयांत लक्ष घातले पाहिजे आणि योग्य कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याच विषयासंदर्भात मंगळवारी वन विभागाच्या अधिकार्यांना आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले असून, त्यांनाही या विषयात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी या संदर्भात सध्या शांत राहून पोलिसांना आपला तपास करू द्यावा, अशी सर्वांना विनंती देखील धीरज घाटे यांनी केली आहे.
आम्हाला याबाबत तक्रारी मिळाली आहे. आम्ही त्याची पडताळणी करीत आहोत. ही मजार जुनी असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सर्व संबंधित विभागांच्या नोंदींनुसार वस्तुस्थिती तपासून पाहिली जाईल. लगेच कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे योग्य नाही.
– जयराम पायगुडे, वरिष्ठ निरीक्षक, दत्तवाडी