राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम राहिला नाही. कोणता नेता उद्या कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना दिसेल, हे सांगताच येत नाही. गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप पाहायला मिळाले. या राजकीय राड्यात भावकीच्या वादानंतर आता काका-पुतण्यातील वादाचा अंक पाहण्यास मिळाला आहे. काका शरद पवार यांचा विरोध डावून पुतण्या अजितदादांनी भाजपासोबत घरोबा केला. राज्याच्या राजकारणाला घराणेशाही नवी नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यातील उत्तम उदाहरण.
दुसरे मोठे उदाहरण म्हणजे, शरद पवार आणि अजित पवार. अजित पवार हे शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात आले. काका पवारांनी वेळोवेळी त्यांना मोठी जबाबदारी सोपवली आणि दोन वेळा राज्याच्या उपमु‘यमंत्रिपदी बसवले. एवढेच नाही तर, अजितदादांची विरोधी पक्षनेतेपदी, गटनेतेपदीही निवड केली. 2019 मध्ये अजित पवारांनी गुपचूप पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी उरकून टाकला, पण पवारांनी वेळीच डाव फिरवल्यामुळे दादा माघारी परतले. काही काळ उलटत नाही तोच पुन्हा एकदा अजितदादांनी भाजपा-शिवसेनेसोबत घरोबा केला.
बाळासाहेब आणि राज ठाकरे
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेते चांगले मित्र आणि तितकेच राजकीय विरोधकही होते. दोन्ही घरात पुतण्याने वेगळी चूल मांडल्याचा प्रकार घडला आहे. याआधी राज ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर पुढे भावकीतील वाद चांगलाच पाहण्यास मिळाला आणि तो सुरूच आहे.
गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे
भाजपाचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे म्हणजेच बीड असे समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा मराठवाड्यात रुजवली. आपल्या काकांचा हात धरून धनंजय मुंडे राजकारणात आले. त्यांच्यासोबत बराच काळ काम केल्यानंतर धनंजय मुंडे अलगद राष्ट्रवादीच्या गळाला लागले. खुद्द अजितदादांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी बीडमध्ये राकाँत प्रवेश केला. पुढे त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवली. 2019 च्या निवडणुकीत पंकजांचा पराभव करीत धनंजय मुंडेंनी विधानसभा गाठली.
क्षीरसागर काका-पुतणे
बीडमध्ये क्षीरसागर काका आणि पुतण्याचा संघर्ष अवघ्या बीडला सर्वज्ञात आहे. क्षीरसागर घराण्याने तीन वेळा खासदारकी भूषवली, पण काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद विकोपाला गेला. 2019 च्या निवडणुकीत काका आणि पुतण्यात थेट लढत पाहायला मिळाली. पुतण्या संदीप यांनी राकाँकडून तर, काका जयदत्त यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला.
तटकरे काका-पुतणे
राष्ट्रवादी काँगे‘समध्ये सुनील तटकरे आणि त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांच्यातील वादही लोकांनी अनुभवला. सुनील तटकरेंनी मुलगी आदिती तटकरे यांना राजकारणात आणले तेव्हा अवधूत कमालीचे नाराज झाले. त्यांनी नाराजी व्यक्त करीत थेट शिवसेनेत प्रवेश केला.
देशमुख विरुद्ध देशमुख
राकाँच्या आणखी एक नेत्याच्या घरात असेच नाट्य पाहायला मिळाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्यात चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. पुतण्या आशिष देशमुखांनी काँग‘ेसमधून 2014 मध्ये निवडणूक लढवत काका अनिल देशमुख यांना पराभूत केले, पण काका हार माणणार थोडी, त्यांनी 2019 च्या निवडणुकीत पुतण्या आशिष देशमुख यांना पराभूत करून परतफेड केली.