अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती : नशिराबादच्या आरोपी शिक्षकाला जन्मठेप

भुसावळ : नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीवर खाजगी क्लास घेणार्‍या शिक्षकाने अत्याचार केल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जळगाव सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर श्रीमती न्या.एस.एन.माने-गाडेकर यांनी गुरुवार, 11 मे रोजी आरोपीला जन्मठेपेसह दोन लाख 25 हजारांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरीक्त एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार असून दंडातील निम्मे रक्कम पीडीतेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तुषार शांताराम माळी (29, नशिराबाद परीसर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे व खाजगी शिक्षकाचे नाव आहे.

फोटो व्हायरलची धमकी देत अत्याचार
नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या पालकांना आरोपी तुषार माळी याने भेटत मुलीला स्कॉलरशीप क्लास लावण्यासाठी गळ घातली व त्यासाठी पैसेदेखील घेणार नसल्याचे सांगितल्याने पीडीता आरोपीकडे क्लाससाठी येत होती मात्र आरोपी तुषार माळी याने शिक्षकी पेशाला काळीमा फासत क्लासच्या एक तास आधी पीडीतेला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला शिवाय त्याबाबतचे फोटो त्याने मोबाईलमध्ये काढून पीडीतेला ब्लॅकमेल करणे सुरू करीत वारंवार अत्याचार केला. पीडीतेने हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारेल, अशी धमकीही आरोपीने दिल्याने पीडीतेने डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान निमूटपणे अत्याचार सहन केला. पीडीतेच्या पोटात दुखू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पीडीतेला विश्वासात  घेतल्यानंतर तिने कुटूंबियांना शिक्षकाच्या काळ्या कारनाम्यांची माहिती दिल्याने त्यांना धक्काच बसला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुरनं.19/2018 भादंवि 376, पोस्को 4 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

जन्मठेपेसह दंडात्मक शिक्षा
नशिराबाद पोलिसांनी दोन महिन्यात गुन्ह्याचा तपास करीत दोषारोपपत्र जळगाव सत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात 16 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडीता व डॉक्टरांसह. पंच, डीएनए एक्सपर्ट यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
सरकारी वकील अ‍ॅड.रमाकांत सोनवणे यांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्यातील मुद्दे न्यायालयासमोर मांडत प्रभावी युक्तीवाद केल्यानंतर आरोपीला श्रीमती न्या.एस.एन.माने-गाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच विविध कलमान्वये दोन लाख 25 हजार रुपये दंड सुनावला. दंडातील अर्धी रक्कम पीडीतेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले शिवाय राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडीतेच्या कुटूंबाला पुर्नवसनासाठी दहा लाख रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले. या गुन्ह्याचा पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी केला. या गुन्ह्यात न्यायालयात मदतनीस म्हणून पोलीस हवालदार गुणवंत सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे यांनी सहकार्य केले.