दुर्दैवी! ताशी 300 किलोमीटर प्रति तास वेगाने बाइक चालवणाऱ्या चौहानचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३। प्रसिद्ध बाइक रायडर आणि युट्युबर अगस्त्य चौहान याचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अपघातावेळी युट्युबर अगस्त्य ताशी 300 किलोमीटर प्रति तास वेगाने रेसिंग बाइक चालवत होता. याचवेळी त्याची बाइक डिव्हायडरवर धडकून अपघात झाला.  3 मे रोजी सकाळी यमुना एक्स्प्रेस हायवेवर ही घटना घडली.

सूत्रानुसार, उत्तराखंडमधील प्रसिद्ध युट्युबर अगस्त्य चौहान 25 वर्षे डेहराडूनच्या चक्रता रोडवरील कपरी ट्रेड सेंटरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. बुधवारी सकाळी तो डेहराडूनवरुन दिल्लीकडे निघाला होता. दिल्ली मध्ये युट्युबर्सची बैठक होणार होती. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तो दिल्लीला निघाला होता. अगस्तसोबत त्याचे 4 युट्युबर मित्र देखील होते. अगस्त्य यावेळी त्याची आवडती निन्जा ZX10R सुपरबाइकवरून प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याचा अपघात झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला.

अगस्त्य यमुना एक्स्प्रेसवेच्या माईलस्टोन क्रमांक-47 वर पोहोचताच त्याचा बाइकवरील ताबा सुटला आणि ती डिव्हायडरवर जोरात धडकली. अपघातादरम्यान अगस्त्यचे डोके रस्त्यावर आदळले गेले आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यावरील हेल्मेटचा चुराडा झाला होता. अपघातामध्ये जखमी झालेल्या अगस्त्यचा जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर अलीगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अगस्त्यच्या गाडीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

अगस्त्यचा अपघात झाला त्यावेळी तो ताशी 300 किलोमीटर वेगाने बाइक चालवत होता. ऐवढंच नाही तर तो वेगाने बाइक चालवताना व्हिडिओ देखील रेकॉर्ड करत होता. या अपघातानंतर अलीगड पोलिसांनी वाहन चालवताना नेहमी वेग नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसंच अतिवेग हे रस्ते अपघाताचे  प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.