अर्थसंकल्प २०२३ : भारतीय अर्थकारणाची ” जोडो भारत ” यात्रा

आर्थिक वर्ष २०२३-२४ साला साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रिय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी आपल्या संसदेत सादर केला आहे. नेहमीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पाबाबत प्रसारमाध्यम, आणि अगदीं समाज – माध्यमात सुध्दा, चर्चा तशी बेताचीच होते आहे. सकृतदर्शनी तरी अनेकांना थोडेफार तरी या अर्थसंकल्पात मिळाले आहे. निदान आत्ता तरी तसे वाटते आहे. हे अशी चर्चा कमी करण्याचे कारण आहे की आपण फार बोलून किंवा कमी बोलून त्यात जरासुद्धा फरक पडत नाही याचे पुरेसे भान आल्यामुळे अशी चर्चा यंदा कमी आहे हाही प्रश्न आहेच.
अशावेळी ही उणीव किंवा कमतरता थोडी फार तरी, निदान आपल्याला शक्य आहे तेवढी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून हा लेख – प्रपंच.

यावेळचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यापासून मला फार वाटते आहे की या अर्थसंकल्पाचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करता येऊ शकते.

जर सध्याच्या राजकीय परिभाषेत याचे वर्णन करायचे झाले तर माझ्या मते २०२३ – २४ सालासाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प म्हणजे ” आर्थिक दृष्ट्या भारत जोडो यात्रा ” आहे.
साहजिकच ही यात्रा करणारी व्यक्ती वेगवेगळी आहे.
त्यामागे उभी असलेली संस्थात्मक संरचना भिन्न आहे.
या दोन्हीं यात्रांचे उद्दिष्ट आणि कारणमीमंसा वेगवेगळी आहे.
आणि त्यामुळे या दोन यात्रांचे होणारे किंवा होऊ शकणारे परिणाम वेगवेगळे असतील किंवा असू शकतील.
निदान या दोन यात्रा एकमेकांचे कारण किंवा परिणाम नाहीत हे मात्र निश्चित.
पण या दोन्हीं आपापल्या परीने ” भारत जोडो यात्रा ” आहेत हे निश्चित!
या दोन यात्रांचे भारत एक आहेत की तेही वेगवेगळे आहेत हा चर्चेचा , प्रसंगी वादाचा , विषय होऊ शकतो.
तरीही हा अर्थसंकल्प एका अर्थाने ” जोडो भारत यात्रा ….’!

या अर्थसंकल्पाचे आर्थिक परिभाषेत वर्णन करायचे झाले तर आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आत्मनिर्भर भारत यांचे संतुलन साधणारे संकल्प असा हा अर्थसंकल्प आहे.
कदाचित असे वर्णन स्वातंत्र्योत्तर भारताच्या संसदेत याआधी सादर झालेल्या अगदीं अनेक नसल्या तरी काहीं अर्थसंकल्पाचे नक्कीच करता येइल. पण अशा आधिच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पाचा पोत वेगळा आहे. असे आधीचे अर्थसंकल्प आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या दबावातून जन्माला आले होते. आंतरराष्ट्रीय अर्थकारण एक संकट आहे अशा मनस्थितीतून व परिस्थितीतून सादर झाले होते.
तर यंदाचा अर्थसंकल्प आंतरराष्ट्रीय अर्थकारण ही एक संधी आहे अशा भूमिकेतून सादर झाला आहे.
वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर यंदाचा अर्थसंकल्प हा एका सक्षम स्थानातून ( Position of Strength ) सादर झाला आहे. आता काहीं बाबतीत तरी आमची एक राष्ट्र म्हणून भूमिका , एक देश म्हणून पवित्रा आमचा आम्हीं ठरवू असे संयत पण स्पष्टपणे सांगणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
तुलनेने असे आधीचे अर्थसंकल्प हे कमकुवत ( Position of Weakness) पणातून सादर झाले होते.
अगतिक ते प्रागतिक असा तो प्रवास आहे.
अशाही अर्थाने हा अर्थसंकल्प म्हणजे ” जोडो भारत यात्रा…..”!

शेअर – बाजाराच्या परिभाषेत बोलायचे झाले तर एकाच दिवशी निर्देशांकात वाढ आणि घट अनुभवायला देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या काळात , आणि एरवीही , शेअरबाजाराच्या निर्देशांकात चढ – उतार होणे आणि होत राहाणे हा बाजाराचा स्थायीभाव आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य गुंतवणूकदार मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी या दोन निर्देशांकनवर लक्ष ठेवून असतात. आणि दिवसभराची उलाढाल संपत असताना हे दोन्हीं निर्देशांक हे साधारणपणे एकाच दिशेने प्रवास करत असतात. अर्थात निफ्टीच्या तुलनेत साधारणपणें सेन्सेक्स अडीच ते तीन पट बदलतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. दिशा एकच राहते. पण यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी २०२३ रोजी त्या दिवशीच्या उलाढाल संपत असताना सेन्सेक्स सुमारे १४८ अंशांची वाढ दाखवत असताना निफ्टी मात्र ४८ अंशानी खाली आला होता. याआधी अलिकडच्या काळात असे घडले आहे हे जरी खरे असले तरी अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी असे होण्याची ही पहिलीच वेळ.
अशा अर्थाने चढ – उतार एकत्र आणणारा हा ” जोडो भारत ” वाला हा अर्थसंकल्प!

अर्थसंकल्प – पूर्व आढावा ( एकोनोमिक सर्व्हे ) आणि अर्थसंकल्पीय भाषण लक्षात घेत बोलायचे झाले तर गेल्या काही वर्षांत आपल्या देशाची अर्थव्यवस्था ( एकिनोमी) अर्थव्यवस्थेचा आकार या निकषावर जागतीक क्रमवारीत १० व्या स्थानावर असणारी आपली अर्थव्यवस्था आता या क्रमवारीत ५ व्या स्थानावर आली आहे. या काळातील आर्थिक संकटे आणि त्यावर केलेलीं उपाय – योजना याना पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. अशा अर्थाने ही हा अर्थसंकल्प म्हणजे ” जोडो भारत ” यात्रा आहे.

या काळात जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत आपली स्थिती चांगली असण्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे असंघटीत क्षेत्र ! असंघटीत क्षेत्राचा जोमाने झालेला विस्तार आणि सातत्य यांना एकत्र आणून ते क्षेत्र येणाऱ्या काळातही सातत्यपूर्ण सकारात्मक कामगिरी करेल असा विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे. अशाही अर्थाने यंदाचा अर्थसंकल्प हा ” जोडो भारत यात्रा ” आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पातील उद्योग क्षेत्राशी संबंधित तरतुदींचे स्वरूप पाहाताना लक्षात येणारी गोष्ट म्हणजे विविध आकाराच्या औद्योगिक घटकांत सातत्य – संपर्क – संधी यात वाढ करण्यावर जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. असंघटीत – कुटिरोद्योग – लघुउद्योग – मध्यम आकाराचे उद्योग – , मोठ्या आणि अतीमोठ्या आकाराचे उद्योग यांनी एकमेकांसाठी मागणीदार आणि पुरवठादार होण्यास साहाय्यभूत होणाऱ्या यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूदी म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्राची भारत जोडो यात्राच !

याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या अर्थसंकल्पातील हिरे – निर्मिती उद्योग विषयक असणाऱ्या तरतूदी !
मुळात तेल आणि सोने याच्या खालोखाल आयात – मूल्य या निकषावर आपल्या देशाच्या आयातीचा मोठा घटक म्हणजे हिरे. ते परवडणारे नाही हे लक्षात घेऊन निदान Lab Generated Diamonds अशा अर्थाने कृत्रिम हिरे याबाबत संशोधन – निर्मिती – परीक्षण अशा विविध पातळ्यांवर शिक्षण संस्था – प्रयोगशाळा – उत्पादक यांची साखळी वेगवेगळ्या पातळ्यांवर घालणारा हा अर्थसंकल्प ” भारत जोडो ” नाही तर दुसरे काय आहे ?

हाच प्रकार 5g टेक्नॉलॉजी बाबतही यंदाच्या अर्थसंकल्पात आहेच की !
ते तांत्रिक क्षेत्रातले भारत जोडो असे सहजच म्हणता येईल.
एकापेक्षा जास्त अर्थाने

यंदाच्या अर्थसंकल्पबाबत कमी चर्चा होण्याचे एक कारण असू शकेल की अशी भूमिका बुचकळ्यात पाडणारी आहे. निदान ती आपल्या सरावाची नाही.
गंमतीने असे म्हणावेसे वाटते की याबाबात आपली परिस्थिती ” पठाण ” सिनेमा सारखी झाली आहे.
शाहरुख खान म्हणतो की त्याच्या पठाण सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला केला .
पण त्याचा हा सिनेमा लावणारी थिएटर्स म्हणतात की ते नुकसानीत आहेत.
आणि आपण सगळे म्हणत आहोत की या दोन्हीं गोष्टी एकाचवेळी कशा काय शक्य आहेत ?

एक गोष्ट नक्की की आपले राष्ट्रीय अर्थकारण आणि क्रिकेटर सूर्यकुमार यादव हे ३६० दिग्रीच्या गोष्टी आहेत…. अडचणी आहेत हे नक्की; पण त्यावर उपाय आहे हेही नक्की असे सांगणारे दोन प्रकार
आणि म्हणूनच
हा अर्थसंकल्प भारतीय ” राष्ट्रीय ” अर्थकारणासाठी ” , अमृत ठरेल का हे येणारा काळ ठरवेल.

” भारत जोडो ” असे असतें .
असेही असतें.
असेच असते आणि असावे.

चन्द्रशेखर टिळक
३ फेब्रुवारी २०२३.