अग्रलेख
विरोधकांपैकी अनेकांची अनेक प्रकारची दुकानं (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे, घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे झाली आहेत.
गेली नऊ वर्षे मोदी पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वात केंद्रातले सरकार सातत्याने देशाला प्रगतिपथावर घेऊन जात आहे. देशहित डोळ्यांपुढे ठेवत अनेकदा त्यांना जनतेला न आवडणारे कटू निर्णय घ्यावे लागले आहेत. पण, त्या निर्णयांचे जे सकारात्मक परिणाम आहेत, ते आता दिसायला लागल्याने जनताही खुष आहे. महागाई, बेरोजगारीचा ताण जनतेवर असला, तरी मोदींची कार्यपद्धती लक्षात घेता सामान्य जनता मोदींच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थनच करीत आली आहे.
त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कितीही आवई उठविली तरी जनता त्याला बळी पडत नाही, हे वास्तव आहे. मोदी यांच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एक येण्याची तयारी गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत. पण, विरोधी ऐक्याचे नेतृत्व कुणी करायचे, याबाबत एकवाक्यता होत नसल्याने ऐक्याची प्रक्रिया पूर्ण होताना दिसत नाही. सुमारे चार वर्षांपूर्वी सगळ्या विरोधकांनी ऐक्याचे प्रदर्शन घडविले होते, त्यांची एकत्र बैठक झाली होती. पण, चार वर्षांपूर्वी होती, तीच स्थिती आजही कायम आहे. विरोधी ऐक्यासाठी एकमेव मुद्दा आहे आणि तो म्हणजे मोदीविरोध. (PM Narendra Modi) मोदी नकोत या एका मुद्यावर विरोधी ऐक्य होऊ पाहात आहे. पण, मोदी नकोत तर त्यांना पर्याय कोण, याचे उत्तर शोधताना विरोधकांची दमछाक होत आहे. मोदींना पर्याय म्हणून आपण काय देणार आहोत, आपल्याकडे ठोस विचार कोणता, विकासाची योजना काय, जनतेच्या कल्याणासाठी नेमके करणार काय, याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकदाही चिंतन झालेले नाही. मोदीविरोधाने आंधळे झालेले विरोधक आपसांत कधीही सकारात्मक चर्चा करीत नाहीत; मुद्यांवर आधारित काहीही बोलत नाहीत. विरोधकांपैकी अनेकांना पंतप्रधान व्हायचे आहे. अनेकांची मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. अशा स्थितीत ते मोदींना पर्याय उभा करू शकतील, याची कोणतीही शक्यता आज तरी दिसत नाही.
विरोधी ऐक्याचे नारे लागत असताना देशविकासासाठी नेमका संकल्प काय, याबाबत कुणीच काही बोलायला तयार नाही. मोदींना कशासाठी हटवायचे आणि त्यांना हटवून काय करणार आहोत, हे सांगण्यासाठी विरोधकांकडे काहीच नाही, ही वस्तुस्थिती आहे. (PM Narendra Modi) मोदींच्या सत्ताकाळात भ्रष्ट नेत्यांच्या घरांवर, कार्यालयांवर, प्रतिष्ठानांवर ईडीचे छापे पडत आहेत, त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले जात आहेत, चौकशा केल्या जात आहेत, हे खरे असले तरी मोदी सरकार मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने हे सगळे करते आहे, यावर जनतेचा तरी विश्वास नाही. पण, येऊनजाऊन विरोधकांकडून एकच मुद्दा उपस्थित केला जातो आणि तो म्हणजे आम्हाला त्रास दिला जातोय, वैयक्तिक त्रास दिला जातोय. त्यापलीकडे सांगण्यासारखे काही नसल्याने विरोधी ऐक्य घडून येत नाही, हेही वास्तव आहे.
नितीशकुमार यांना पंतप्रधान (PM Narendra Modi) व्हायचे आहे. के. चंद्रशेखर राव तर बाशिंग बांधून बसले आहेत. ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अधूनमधून शरद पवारांच्याही नावाची चर्चा होते. पण, ऐक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात विरोधी पक्षांचे काही नेते एकत्र आले होते. मोदीविरोधी आक्रमक झालेल्या नितीशकुमारांनी ऐक्याचे आवाहन केले. काँग्रेसकडून सलमान खुर्शिद हजर होते. त्यांनी ऐक्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींपर्यंत म्हणजे राहुल-सोनियांपर्यंत पोहोचवावे, अशी विनंती नितीशकुमारांनी केली. खुर्शिदांनी तसे आश्वासनही दिले. पण, काँग्रेसला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, असे रोखठोक विधान काँग्रेसकडून दुसर्याच दिवशी आल्याने पाटण्यात जे काही घडले, त्यावर लागलीच पाणी फेरले गेले. काँग्रेसने गतकाळात कधीच भाजपाशी हातमिळवणी केली नाही, याची आठवणही करून देण्यात आली. एकप्रकारे हा नितीशकुमार आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टोलाच होता. महाराष्ट्रात काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी राष्ट्रवादीच्या मदतीने 2019 साली निवडणुकोत्तर आघाडी केली होती. पण, आज महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत.
एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 13 खासदारांना सोबत घेऊन सरकार तर स्थापन केलेच; (PM Narendra Modi) शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही मिळविले आहे. महाराष्ट्रातल्या सर्वात अनुभवी आणि जाणत्या म्हणवल्या जाणार्या नेत्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तुलनेने नवख्या नेत्याने जो धोबीपछाड दिला आहे, तो कायम त्यांच्या लक्षात राहील. जनतेने नाकारलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी साथसंगत करून उद्धव ठाकरे आजतरी सगळं काही गमावून बसले आहेत आणि ज्या शरद पवारांनी त्यांना भाजपापासून तोडले, ते पवार आता उद्धव यांना नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला देत आहेत. उद्धव यांच्या पक्षात जे विभाजन घडून आले आहे, त्याचा फायदा हा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसलाच होणार, हे निश्चित! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर आतापासूनच उद्धव गटाला फाट्यावर मारणे सुरू केले आहे. ज्याची जेवढी क्षमता तेवढा आघाडीत त्याला हिस्सा दिला जाईल, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले आहे. यावरूनच आपल्या लक्षात येईल की, विरोधी ऐक्याची प्रक्रिया किती तकलादू आहे. मोदींशी लढायला निघालेल्या विरोधकांमध्ये आपसातच एवढे टोकाचे मतभेद आणि स्पर्धा आहे की त्यांचे ऐक्य घडून येणे केवळ अशक्य दिसते.
मोदीविरोध या एकमेव मुद्यावरून एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये जी स्पर्धा आहे, ती त्यांच्या अस्तित्वालाही मारक ठरू शकते. त्यांना मोदींना हटवायचे असेल तर सर्वप्रथम आपला चेहरा कोण, हे नक्की करावे लागेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (PM Narendra Modi) मोदींपुढे मोठे आव्हान उभे करायला निघालेल्या विरोधकांमध्ये निवडणुकीपूर्वी ऐक्य होईल, हे आज तरी शक्य दिसत नाही. कारण, निवडणुकीनंतर ऐक्याबाबत पाहू, असे काँग्रेसने अप्रत्यक्ष सांगूनच टाकले आहे. विरोधकांमध्ये काँग्रेस हाच सगळ्यात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची ताकदही इतरांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे विरोधी ऐक्यात काँग्रेस पूर्ण क्षमतेने सहभागी होत नाही, तोपर्यंत विरोधकांचे ऐक्य होऊ शकत नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशव्यापी यात्रा काढण्याची क्षमता विरोधकांत फक्त काँग्रेसमध्येच आहे, हे अप्रत्यक्ष दाखवून दिले आहे. त्यामुळे नितीशकुमार आणि इतर चिल्लर पार्टीला काँग्रेसकडून फार महत्त्व दिले जाईल, याचीही शक्यता नाहीच.
ज्यांच्या पक्षाचे दहा-बारा खासदारही निवडून येत नाहीत, त्यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. शरद पवार थेट काही बोलत नसलेत, तरी त्यांचे समर्थक अधूनमधून तशी इच्छा जाहीर करीत असतात. बिनबुडाचे संजय राऊतही पवारांच्या पंतप्रधानपदासाठी वकिली करीत असतात. नितीशकुमार जाहीरपणे बोलत नसले, तरी मनातून तेही इच्छुक आहेत. चंद्रशेखर राव यांनी तर त्यांच्या पक्षाचे नावच बदलले आहे. ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी इतर कुणाच्या नावाला संमती देतील, याचीही कोणतीच शक्यता नाही. शिवाय, विरोधी ऐक्यात अनेक असे नेते आहेत, ज्यांना मोदींना हटवण्याससोबतच स्वत:चा मार्गही प्रशस्त करायचा आहे. अशा सगळ्या स्वार्थी नेत्यांचे हे कडबोळे एकत्र येऊन विरोधी ऐक्य साधतील आणि (PM Narendra Modi) मोदी नावाच्या वादळाशी मुकाबला करतील, हे दिवास्वप्नच! बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तेलंगणामध्ये केसीआर, बिहारमध्ये नितीशकुमार असे प्रादेशिक पक्ष आणि नेते आहेत. जो जिथे प्रबळ आहे, त्याला इतरांनी आणखी मजबूत करावे, अशी इच्छा ममतांनी व्यक्त केली होती. याचा स्पष्ट अर्थ असा की, काँग्रेसनेही आमच्या प्रदेशात हस्तक्षेप करू नये. असे जर असेल तर काँग्रेस हे मान्य करणार नाही आणि विरोधी ऐक्य कधीच प्रत्यक्षात येणार नाही. जो पक्ष सगळ्यात मोठा, ज्याचे खासदार सर्वात जास्त त्याच्याकडे नेतृत्व ही काँग्रेसची भूमिका आहे आणि ती रास्तही आहे. पण, यामुळे महत्त्वाकांक्षी विरोधी पक्षनेते बिथरले आहेत आणि ते काँग्रेसकडे नेतृत्व सोपवायला तयार नाहीत. अशा स्थितीत (PM Narendra Modi) मोदींना आव्हान देत त्यांना सत्तेतून घालवण्याचे जे प्रयत्न आहेत, ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत.