खान्देशावर पुन्हा अवकाळी पावसाचे ‘संकट’

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठ्वड्यापासून अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची नोंद नव्हती मात्र अजून आगामी तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा  भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये २६ मार्च पर्यंत हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात ३ ते ८ मार्च व १४ मार्च ते २० मार्चपर्यंत अवकाळी पाऊस झाला होता. त्यात जिल्ह्यातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाहीत.

त्यातच जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत पावसाची स्थिती रहाणार आहे. मात्र २७ मार्चपासून हळू हळू वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी होऊन कोरडे हवामान वाढणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाजही आहे.