पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता हवामान तज्ज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.
ऐन उन्हाळ्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचं तापमान हे घसरलं आहे. ऐन उन्हाळ्यात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आता हवामान तज्ज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. थंड उन्हाळ्यामुळे किंवा सततच्या अवकाळी पावसामुळे तापमान घसरल्याने मान्सूनवर त्याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारताचा बहुतांश भूभाग उन्हाळ्यात तापण्याऐवजी थंड होण्याचा कल असेल. हवामानातील या बदलामुळे भारतात मान्सून लांबण्याची शक्यता आहे. साधारणतः भारतात मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो. भारतात मार्च ते मे हा मान्सून पूर्व कालावधी आहे. हा काळ नैऋत्य मोसमी पावसाच्या निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो, असं माजी सचिव डॉ. एम. राजीवन यांनी म्हटलं आहे.