पिंपळनेर : पिंपळनेर शहरासह परिसरातील गावांत बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी चिकसे, सामोडे, देशशिरवाडे, बल्हाणे, दहिवेल, चिंचपाडा व बोधगाव आदी गावांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चिकसे, सामोडे, देशशिरवाडे, बल्हाणे व इतर गावांत बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही गावात मुसळधार पाऊस तर काही गावांमध्ये गारपीठ झाली आहे. दहिवेल,चिंचपाडा,बोधगावमध्ये गारपीठ,अवकाळी पाऊस व वेगवान वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका ,कांदा,गहू यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिके काढली असून अनेकांचा शेतीमाल काढणी करून शेतात पडलेला होता. तर काहींच्या शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बल्हाणे गावात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाचे नुकसान झाले असून याच गावात एका पिठाच्या गिरणीची मोटारही जळाली आहे.
एकूणच अवकाळी पावसाने ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत.