---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा जिल्ह्याला पुढील आठवडाभर पावसाचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि आता ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरात सुमारे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती कायम आहे.
बुधवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने २ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता पुढील आठवडाभर जिल्ह्यात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अवकाळीने मोठे नुकसान
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ऐन काढणीला आलेल्या कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच ज्वारी, दादर आणि मका या खरीप पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे.









