पुणे | 12 ऑगस्ट 2023 | राज्यभरात सध्या पावसाने दडी मारलेली आहे. अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलं. अनेक नद्यांना पूर आला. पण काही जिल्हे पावसापासून उपेक्षित राहिले. त्यांना हवा तसा पाऊस यावर्षी मिळालेला नाही. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून महाराष्ट्रात कधी पाऊस येऊ शकतो, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागाचे वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर पावसाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास सध्या फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. 19 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सध्या सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे.
19 ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 25 ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड येथे पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सरासरी इतका, किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे.