देशभरात चर्चा आहे ती पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांची. राजस्धान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत असून मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपामध्ये थेट लढत दिसत असताना तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज एग्झिट पोल्सच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये हा कौल अधिकाधिक स्पष्ट होऊ लागताच तेलंगणामधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
काँग्रेस सर्व संभाव्य शक्यतांसाठी सज्ज!
तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस सतर्क झाली आहे. हैदराबादमध्ये काही लग्झरी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व विजयी आमदारांना लगेच हॉटेलमध्ये हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडत असले, तरीही कोणताही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळी तयार नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.