कार्यकाळ संपण्याआधीच UPSC चे चेअरमन मनोज सोनींच्या राजीनाम्याने खळबळ

नवी दिल्ली । एकीकडे पूजा खेडकरसह देशभरातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असतानाच संघ लोक सेवा आयोग अर्थात यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये म्हणजे पाच वर्षानंतर संपणार होता. परंतु त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला असून यामुळे अनेक अर्थ काढले जात आहेत.

सोनी हे 2017मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून आले होते. 16 मे 2023 रोजी त्यांना यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाच्या अनुपम मिशन या संस्थेला सोनी हे अधिक वेळ देणार आहेत. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाशी सोनी यांच्या राजीनाम्याचा काहीच संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. केवळ वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला आहे.