मुंबई : शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. यापार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी दुपारी १ वाजता मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पक्षाची महत्वाची बैठक बोलावली आहे. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाणार
दरम्यान, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. असे टिकास्त्र उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोडले होते. हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथे निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.