Vaibhav Suryavanshi : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया कसोटी खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेत शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांच्यासह अनेक खेळाडू खेळताना दिसतील. अशातच बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने टीम इंडियाच्या अंडर-१९ संघाचीही घोषणा केली आहे. यात वैभव सूर्यवंशी याचाही समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या १९ वर्षांखालील १६ सदस्यीय संघाची कमान आयुष म्हात्रे याच्याकडे आहे. आयुष आणि वैभव दोघेही केवळ आयपीएल २०२५ मध्ये खेळले नाहीत तर त्यांनी वर्चस्वही गाजवले आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, ते आता इंग्लंडमध्ये भारतासाठी अंडर १९ क्रिकेट जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. खुद्द वैभव सूर्यवंशी यानेच याबाबत खुलासा केला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपल्यानंतर, वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडशी संवाद साधला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच संभाषणादरम्यान, वैभव सूर्यवंशीने द्रविडला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. तो म्हणाला की आता त्याला भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या शिबिरात सामील व्हावे लागेल आणि त्यांना विजयी करण्यासाठी तयारी करावी लागेल.
१९ वर्षांखालील संघाची मालिका २४ जूनपासून सुरू होईल आणि २३ जुलैपर्यंत चालेल. या काळात, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघासोबत ५० षटकांचा सराव सामना खेळण्याव्यतिरिक्त, भारताचा १९ वर्षांखालील संघ ५ एकदिवसीय आणि २ बहु-दिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळेल.
दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार, २४ जून रोजी ५० षटकांचा सराव सामना होईल. २७ जून ते ७ जुलै दरम्यान ५ एकदिवसीय सामने खेळले जातील. पहिला बहुदिवसीय सामना १२ ते १५ जुलै दरम्यान असेल, तर दुसरा बहुदिवसीय सामना २० ते २३ जुलै दरम्यान असेल.