---Advertisement---
पाचोरा : पाचोरा -भडगाव मतदार संघातील शिवसेना (उबाठा)गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यातून त्यांनी आपल्या नव्या राजकीय इनिंगचा प्रारंभ केला आहे. मुंबईत नुकताच झालेल्या प्रवेश सोहळ्यानंतर शुक्रवारी (२२ ऑगस्ट) पाचोरा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी पक्षांतर केले असून कोणत्याही प्रकारची गद्दारी केलेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडतांना कोणतीही लपवाछपवी न करता मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण पक्ष सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. खुर्ची, पैसा किंवा वैयक्तिक फायद्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. त्यांची खरी निष्ठा खुर्चीशी किंवा सत्तेशी नसून मतदारांशी आहे. समाजसेवा आणि विकासाचा ध्यास घेऊनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. “मला ‘पॉलिटिकल अॅक्टिव्हिझम’ हवा होता. लोकसेवेचा नवा मार्ग म्हणून मी भाजपची निवड केली आहे,” असे त्या म्हणाल्या.
भाजपमध्ये प्रवेश हा कोणत्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाखातीर घेतलेला निर्णय नसल्याचेही वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. आमचे सर्व व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक आहेत. आमचे कोणतेही नंबर दोनचे व्यवसाय नाहीत. त्यामुळे ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या भीतीने मी भाजपमध्ये गेले, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. ज्यांनी खोक्यांनी घरे भरलीत,टक्केवारीतून गब्बर झालेत त्यांनाच भीती वाटते. आम्ही निर्भय आहोत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
आपला निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून निकटवर्तीय, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार यांच्याशी चर्चा करून सामूहिक पद्धतीने घेतल्याचे त्यांनी सांगितले. “मी कोणत्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
पक्षांतराच्या प्रक्रियेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा ठरल्याचे वैशाली सूर्यवंशी यांनी नमूद केले. “वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच मी पक्षांतराचा निर्णय घेतला. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनीही माझ्या विचाराला पाठींबा दिल्याने मला आत्मविश्वास मिळाला,” असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी आपल्या राजकीय वाटचाली बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “मी मैदान सोडलेले नाही. येथेच राहून सेवा करणार, संघर्ष करणार आणि माझे वडील तात्यासाहेब सूर्यवंशी यांच्या नावाला शोभेल अशी कामगिरी करणार आहे. भाजपचा विचार हा सेवेचा, देशहिताचा आणि प्रगतीचा आहे. या व्यापक प्रवाहात मी नव्या इनिंगची सुरूवात करत आहे.”
याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, सदाशिव आबा पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे व भाजपाचे पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते.