‘या’ देशात हिंदूंच्या १४ मंदिरांची तोडफोड

नवी दिल्ली : बांगलादेशात एकाच वेळी तब्बल १४ मंदिरांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बांगलादेशात राहणारे हिंदू लोक बरेच तणावात आहेत. कारण, या विचित्र घटनांमध्ये काही अंशी त्यांच्या मालमत्तेला हानी पोहोचवली जात आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून हिंदूंना सुरक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे.

अहवालानुसार, बांगलादेशातील ठाकूरगावच्या बालियाडांगी येथे मंदिरांमध्ये तोडफोड करण्याची घटना घडली. गावात राहणारे हिंदू समाजाचे नेते विद्यानाथ बर्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेत मंदिरांवर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ले करण्यास सुरुवात केली. लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी १४ मंदिरांची तोडफोड केली. या दरम्यान अनेक मूर्तींचे तुकडे तुकडे करण्यात आले तर अनेक मूर्ती जवळच्या तलावात फेकण्यात आल्या.

मंदिरांच्या तोडफोडीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले ठाकूरगावचे पोलीस प्रमुख जहांगीर हुसेन यांनी सांगितले की, तोडफोडीची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. प्रथमदर्शनी ही बाब परिसरातील शांतता बिघडवण्याचा कट असल्याचे दिसते. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.