वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी; म्हणाले…

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल गांधींचा आहे. मुस्लीमांचे लांगुनचालून करण्याचं राजकारण काँग्रेस करतेय. जो कुणी सावरकरांचा अपमान झाल्यानंतर मैदानात उतरतो त्याला सावरकरवादी मी मानतो. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असू शकते तसे काँग्रेस नेत्यांच्या मनातही आहे. परंतु ते कृतीत दिसत नाही तोवर त्यांचं बोलणं व्यर्थ आहे, अशी स्पष्ट भुमिका वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी मांडली आहे.

रणजित सावरकर म्हणाले की, सावरकर यांचा वापर राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींकडून केला जातोय. सावरकर हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यांच्यावर आरोप केले तर मुस्लिमांची मते मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशाप्रकारे उपयोग होणे गंभीर आहे. काँग्रेससोबत असणारे पक्षही सावरकरांचा वापर करतायेत. बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा उपलब्ध दिली. मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले परंतु आज त्यांचा वारसा असणारे आज जी भूमिका घेतायेत ते दुर्दैवी आहे.

तसेच सावरकरांचा आदर बाळगणारे लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत परंतु ते आवाज उचलत नाही. शिवसेनेत फूट पडल्याचे दु:ख आहे. शिवसेना जी बोटचेपी भूमिका घेत होती त्यावर अनेक शिवसैनिक नाराज होते. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली ती स्वागतार्ह आहे. परंतु ते स्वत: मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या शिदोरी मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत सावरकरांवर लिखाण करण्यात आले. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं, भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्री असताना ते कारवाई करू शकले असते. मात्र त्यांनी केली नाही. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान राहुल गांधींनी केला आहे. त्यासाठी त्यांना माफी मागायला भाग पाडा, अन्यथा तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.