गंभीरचा शिष्य चालला इंग्लंडला, 2 वर्षांपासून मिळाली नाही टीम इंडियात संधी

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळून 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही या खेळाडूला  टीम इंडियात संधी मिळाली नाही. या खेळाडूने आता आपल्या करिअरसाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू लवकरच इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यंकटेश अय्यर या वर्षीचा एकदिवसीय चषक आणि दोन काउंटी चॅम्पियनशिप सामने लँकेशायरकडून खेळणार आहे. लँकेशायरने भारतीय खेळाडूसोबत पाच आठवड्यांसाठी करार केला आहे. वेंकटेश कौंटी क्रिकेटचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेंकटेशसाठी आयपीएलचे मागील 2 सीझन खूप चांगले गेले. आयपीएल 2024 मध्ये, त्याने कोलकाता नाइट रायडर्ससाठी एकूण 370 धावा केल्या, ज्यामुळे संघाला विजेतेपद मिळवण्यात मदत झाली.

काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक 
लँकेशायर क्लबच्या प्रसिद्धीपत्रकात व्यंकटेश म्हणाला की, इंग्लंडमध्ये प्रथमच काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी मी उत्साहित आहे. लँकेशायर हा एक ऐतिहासिक क्लब आहे आणि भारतीय खेळाडूंचा येथे स्वतःचा इतिहास आहे. फारुख इंजिनियर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अलीकडेच वॉशिंग्टन सुंदर या जर्सीत खेळले आहेत. ती परंपरा मला पुढे चालवायची आहे. इंग्रजी परिस्थितीत लाल आणि पांढऱ्या दोन्ही चेंडूंद्वारे माझ्या कौशल्याची चाचणी घेतल्याने माझ्या खेळाला खूप फायदा होईल. मला आशा आहे की मी माझ्या खेळाने चाहत्यांचे मनोरंजन करू शकेन आणि माझ्या संघाला दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करेन.

व्यंकटेश अय्यरला २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी हार्दिक पांड्या जखमी झाला होता. व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 2 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 24 आणि टी-20 मध्ये 133 धावा केल्या आहेत. त्याने 5 विकेट्सही घेतल्या आहेत. वेंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा सामना फेब्रुवारी २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही.