महाराष्ट्र राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गटात कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांची नियुक्ती

ळगाव :  राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संशोधन क्रियाकलापांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गटात” कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

       उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या गटाची स्थापना केली आहे. राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील संशोधनाच्या व नवोपक्रमांच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर करणे, राज्यातील प्राधान्य संशोधन क्षेत्रे निश्चित करणे, संशोधन प्रकल्पाचा मागोवा घेण्यासाठी यंत्रणा तयार करणे, संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करणे, व्याप्ती वाढवणे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि उद्योगांचा सहभाग व सहकार्य वाढविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करणे आदी प्रमुख कार्य या कार्यबल गटाचे असणार आहेत. 

या गटात सहा जणांचा समावेश असून त्यामध्ये कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच याच विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांचा समावेश आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे, पुणे विद्यापीठाच्या नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. संजय ढोले तसेच सीओईपीचे प्रा. एन. बी. ढोके यांचा समावेश आहे. पहिल्या तीन महिन्यात राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील संशोधनाच्या सद्य:स्थितीचा अहवाल या गटामार्फत शासनाला सादर केला जाईल.