तरुण भारत लाईव्ह | ११ डिसेंबर २०२२ | मंत्री गिरिश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिल्या गेलेल्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर खडसे यांच्या नेतृत्वाखालील सहकार गटाला केवळ 4 जागा मिळाल्या तर एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे.
दूध संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
रविवारी सकाळी आठ वाजेपासून रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. यात अरविंद देशमुख आणि संजय सावकारे यांनी अनुक्रमे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय संपादन करत शेतकरी विकास पॅनलचे विजयाचे खाते उघडले. यानंतर ओबीसी प्रवर्गातून पराग वसंतराव मोरे यांनी गोपाळ भंगाळे यांचा पराभव करत सहकारचे खाते उघडले. तर महिला प्रवर्गातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली. यात सहकारच्या छायाताई गुलाबराव देवकर आणि शेतकरी विकासनच्या पूनम प्रशांत पाटील यांनी विजय संपादन केला. यानंतर उत्सुकता लागून असलेल्या मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव करत बाजी मारली.
एकनाथ खडसे यांना धक्का
जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत हायहोल्टेज लढत म्हणून भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्याकडे पाहिले गेले. जिल्हा दुध संघावर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रशासक मंडळाची नियुक्ती करत आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची धुरा देण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. दुध संघाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आपण खडसे कुटुंबातील सदस्याच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी थेट मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. स्वत: मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. मतमोजणी सुरु असतांना दोघांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. शेवटी अवघ्या ४ मतांनी चव्हाण यांनी बाजी मारली.
गुलाबराव पाटील यांची सहकार क्षेत्रात एन्ट्री
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दुध संघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करत सहकारात दिमाखदार प्रवेश केला आहे. गुलाबराव पाटील हे २५९ इतकी मते मिळवून विजयी झाले. ना. गुलाबराव पाटील यांची आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका लढविल्या आहे. मात्र यांनी आतापर्यंत सहकारी संस्थांची निवडणूक लढविली नाही. यंदा मात्र त्यांनी दुध संघाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांनी जळगाव सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला. त्यांच्या समोर महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन यांनी अर्ज दाखल केला होता.