विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांचा जागतिक सन्मान

वेध

– नितीन शिरसाट

1972 साली वाघ (Vidarbha Tiger Reserves) हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित झाला. मांजरीच्या प्रजातीतील हा आकाराने चार ते सहा फूट मोठा प्राणी असून रंग पिवळा, अंगावर काळ्या रंगांचे पट्टे, तांबूस रंगांची फर असते. अत्यंत बहादूर, शूरवीर, शक्तिशाली, दिसायला रुबाबदार मांसाहारी प्राणी असल्याने वाघ दिसताच किंवा परिसरात वाघ असल्याची नुसती चर्चा जरी असली, तरी सर्वसामान्यांची बोबडीच वळते असे नव्हे तर झोपही उडते. त्याच्या एका डरकाळीने संपूर्ण घनदाट जंगल हादरून जाते. भारत देशाला वाघांचे माहेरघर म्हटले जाते. जगात सर्वाधिक वाघांची संख्या भारतात आहे. 1972 मध्ये वाघांना कायद्यानुसार संरक्षण मिळाले व अनेक (Vidarbha Tiger Reserves) व्याघ्र प्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे 1990 पर्यंत चांगले यश मिळाले. 4500 पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.

29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन (Vidarbha Tiger Reserves) म्हणून जगभरात पाळला जातो. अलीकडे वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याने वाघांची संख्या कमी होताना दिसते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे वन विभाग, पर्यावरण संतुलनासाठी वाघांचे संरक्षणासाठी देश पातळीवर घटदाट जंगल व पोषक वातावरणात व्याघ्र प्रकल्प राबविण्यात यशस्वी ठरत आहेत. सिंहांप्रमाणे वाघाच्या संवर्धन व सुरक्षेसाठी भारतात पहिल्यांदा 1973 ला व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात बंदीपूर (कर्नाटक), जीम कार्बेट पार्क (उत्तराखंड), बोर (महाराष्ट्र वर्धा) येथे करण्यात आली. आतापर्यंत सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पांची संख्या मध्यप्रदेश राज्यात असून महाराष्ट्रात मेळघाट (अमरावती), ताडोबा-अंधारी (चंद्रपूर), पेंच (नागपूर), सह्याद्री (सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर), नवेगाव-नागझिरा (गोंदिया) येथे पर्यटनाच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांयुक्त निसर्गरम्य वातावरण आहे. येथे वाघांचा मुक्तसंचार असल्याने प्रत्येकाला जवळून वाघ बघण्याची व पर्यटनाचा आनंद लुटण्याची संधी मिळते.

भारतात 53 लहान-मोठे व्याघ्र प्रकल्प (Vidarbha Tiger Reserves) अस्तित्वात आहेत. दर चार वर्षांनी वाघांची जनगणना होत असून 2018 च्या गणनेप्रमाणे भारतात एकूण 2967 वाघ आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मध्यप्रदेश (526), कर्नाटक (524), उत्तराखंड (442) तर महाराष्ट्रात (312) इतकी वाघाची संख्या आहे. जगातील 80 टक्के वाघ भारतात आहेत. वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी मिळणारा राष्ट्रीय पुरस्कार (टीएक्सटू) सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प तामिळनाडूला मिळाला. त्याचप्रमाणे युनेस्को पुरस्कार मध्यप्रदेशातील बांधवगड पन्ना व्याघ्र प्रकल्पास मिळाला आहे. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकरिता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा केला असून वाघांची संख्या वाढविण्यावर भर दिला गेला आहे तसेच महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून पर्यटकांना विविध सोयीसुविधा, भोजनवस्तू तसेच तरुणांना रोजगाराच्या संधीसाठी हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. जागतिक व्याघ्र मानक संस्था या सर्वोच्च असणार्‍या सीएआय-आयटीएस संस्थेने देशातील एकूण सहा प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यात विदर्भातील ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व मेळघाटचा समावेश आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक व्याघ्र मानक संस्थेची मान्यता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव तसेच केंद्रीय वन विभागाच्या महासंचालकांना पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. अरुणाचल प्रदेशाच्या 20 व्या राष्ट्रीय व्याघ‘ प्रकल्पाचे संवर्धन प्राधिकरण अध्यक्ष केंद्रीय वन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आहेत. भविष्यात वाघांची संख्या वाढविण्यासोबतच पर्यटनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीत भारताने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात चित्ता हा प्राणी नष्ट झाल्याची चिंता व्यक्त केली आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आफ्रिकन 12 चित्ते भारतात आणले. त्याची प्रजाती विकसित होत असल्याची गोड बातमीसुद्धा झळकली आहे. जागतिक स्तरावर विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पांना (Vidarbha Tiger Reserves) मानकाचा दर्जा प्राप्त झाला आहे. हा सन्मान अभिमानास्पद असल्याने मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षात मानाचा तुरा रोवणारा ठरणार आहे. त्यामुळे आता ‘वाघ अजून जिवंत आहे’ असे भविष्यातील पिढीला छातीठोकपणे सांगता येईल.

– 9881717828