पॅरीस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत गुरुवारी पुरुषांच्या भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली. यामध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले, तर नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्सने कांस्य पदक जिंकले. दरम्यान, या स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातून नदीम आणि नीरज यांचं कौतुक होत आहे. या खेळाडूंच्या आईंनीही दोघांचं कौतुक केलं आहे.
नीरजची आई सरोज देवी यांनी म्हटलं होतं की ‘आमच्यासाठी नीरजच रौप्य पदकही सुवर्ण पदकासारखंच आहे. ज्या अर्शदने सुवर्ण जिंकलं, तोही आमच्या मुलासारखाच आहे.’ यानंतर आता अर्शदच्या आईने एका पाकिस्तानमधील चॅनलला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘नीरज माझा मुलगा अर्शदचा चांगला मित्रही आणि भाऊपण. हार-जीत नशीबाने होते. नीरजही माझ्या मुलासारखाच आहे. मी त्याच्यासाठीही प्रार्थना केली.’ दरम्यान, त्यांच्या आईच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
शोएब अख्तरने दिली सलामी
अर्शद आणि नीरजच्या आईच्या या शब्दांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील चाहत्यांची मने जिंकली आहेत. माजी क्रिकेटर शोएब अख्तरने नीरज चोप्राच्या आईला सलाम करत लिहिले ‘ज्याचा मुलगा गोल्ड आहे, तो आमचाही मुलगा आहे’ हे फक्त आईच सांगू शकते. अमेझिंग अर्शद आणि नीरज चोप्रा देखील खूप चांगले मित्र आहेत. नीरज चोप्राने अर्शदला अनेक प्रसंगी मदत केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील अर्शदच्या कामगिरीलाही त्याने सलाम केला आणि पाकिस्तानी खेळाडूने त्याच्यापेक्षा खूपच चांगली कामगिरी केल्याचे मान्य केले.