Video : ब्रह्मपुत्रा नदीने इशारा पातळी ओलांडली, लोकांनी सोडली घरे

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तसेच दिब्रुगडमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीने देखील इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे सोनितपूरसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून ९८,८०० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.

सखल भागात राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. आतापर्यंत आसाममधील सहा जिल्ह्यांतील ५३,००० लोक पुरामुळे अडकून पडले आहेत. सुमारे तीन हजार हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. अनेक स्थानिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर पडून रस्त्यावर राहावे लागत आहे.