चंद्रपूर : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे. यामध्ये तेलंगणाचा देखील समावेश आहे. तेलंगणा विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. आता 3 डिसेंबरला याचा निकाल जाहीर होईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 14 गावांनी देखील मतदान केलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात असणाऱ्या या गावांना खरंतर विशेष अधिकार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये ते मतदान करू शकतात. या गावांमधील नागरिकांकडे दोन्ही राज्यांमधील मतदान आणि आधार कार्ड आहेत.
जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मपती, अंतपूर, इंदिरानगर, यसपूर, पलासगुडा, भोलापथर आणि लेंडीगुडा अशी या गावांची नावं आहेत. या गावांना दोन्ही राज्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी दोन्हीकडे मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे
या गावांमध्ये दोन्ही राज्यांमधील शाळा आहेत. ग्रामपंचायत एक असल्या, तरी सरपंच वेगवेगळे आहेत. ही सर्व गावं तेलंगणाच्या कोमरभिम आसिफाबाद्या या मतदारसंघात येतात. तेलंगणामध्ये यंदा बीआरएस विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत असणार आहे. भाजप देखील याठिकाणी आपली शक्ती पणाला लावणार आहे. मात्र, तेलंगणामध्ये कुणाचं सरकार येईल हे आता रविवारीच स्पष्ट होणार आहे.