रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक, अनेक जण जखमी

कोलकता : देशात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत हिंसाचार झाल्याचे समोर येत आहे. मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी शक्तीपूर परिसरात घडली. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गेल्या वर्षी, बंगालमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान हिंसाचार झाला होता, ज्यामुळे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला होता. यंदाही तसाच संतापजनक प्रकार घडला आहे. रामनवमीच्या मिरवणुकीवर काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.

निर्माण झालेल्या तणावामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आली असून अतिरिक्त फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भाजपाचे नेते आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, “रामनवमीच्या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती, परंतु शक्तीपूर, बेलडांगा – II ब्लॉक, मुर्शिदाबाद येथे मिरवणुकीवर हल्लेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मिरवणूक अचानक संपली आणि रामभक्तांवर गोळीबार करण्यात आला.” मात्र बहरामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.