Virat Kohli Video : विराट कोहलीचं का होतोय कौतुक? पहा व्हिडिओ

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अखेर १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत पुनरागमन केले आहे. गुरुवारी (३० जानेवारी) दिल्लीकडून तो रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला. दिल्लीचा अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रेल्वेविरुद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात विराट दिल्लीकडून आयुष बडोनीच्या नेतृत्वात खेळत आहे.

विराटच्या पुनरागमनामुळे स्टेडियमवर चाहत्यांची मोठी गर्दी

विराट कोहलीसारखा स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरल्याने स्टेडियमवर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने चाहत्यांसाठी मोफत प्रवेश दिल्याने हजारोंच्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमच्या बाहेर जमले होते. यामुळे काही प्रमाणात गोंधळही निर्माण झाला. मात्र, सामना वेळेत सुरू करण्यात आला.

दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे संघ प्रथम फलंदाजीला उतरला. विराटला मैदानात पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची हीच इच्छा पहिल्या दिवशी पूर्ण झाली.

सुरक्षा भेदून विराटच्या पाया पडला ‘चाहता’

सामन्यादरम्यान एक अनोखी घटना घडली. दिल्ली संघ क्षेत्ररक्षण करत असताना, अचानक एक चाहता सुरक्षा तोडून मैदानात घुसला. तो थेट विराटच्या दिशेने धावत आला आणि त्याच्या पायाशी बसून पाया पडला. विराटने त्याला उभे करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीसा भावूक झाल्याचे दिसून आले.

या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी त्वरित त्या चाहत्याला विराटपासून दूर नेले. यावेळी विराटने सुरक्षा रक्षकांना इशारा करत त्याला मारू नका असे सांगितले. त्याच्या या दयाळूपणामुळे चाहते आणि क्रिकेटप्रेमी त्याचे कौतुक करत आहेत.

१३ वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन

विराट कोहलीने याआधी शेवटचा रणजी सामना २०१२ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने दिल्लीकडून रणजी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला नव्हता. मात्र, बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केल्यामुळे विराटने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आहे.

हेही वाचा : धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला

सध्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील शेवटच्या साखळी फेरीतील सामने सुरू आहेत. यानंतर बाद फेरी खेळवली जाणार आहे. दिल्ली संघासाठी पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी रेल्वेविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

विराटचा रणजी प्रवास

विराट कोहलीने २००६ मध्ये तमिळनाडूविरुद्ध दिल्लीकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आत्तापर्यंत त्याने २३ रणजी सामने खेळले असून त्यात ५ शतकांसह १५४७ धावा केल्या आहेत. आता रणजी ट्रॉफीमध्ये त्याचे पुनरागमन कसे होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.