India vs Bangladesh 2nd Test : कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेले होते. त्यामुळे भारत-बांगलादेश कसोटीचा निकाल ड्रॉ लागेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, कर्णधार रोहित शर्माने डाव खेळला अन् खेळाडूंनी त्याचा विश्वास सार्थ ठरवताना विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिका २-० अशी खिशात घातली. त्यानंतर कानपूरच्या मैदानावर जे दिसलं ते हृदय पिळवटून टाकणारं चित्र होतं. कारण त्या छायाचित्रांमध्ये विराट कोहली बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला एक अविस्मरणीय भेट देताना दिसत होता. विराट कोहलीच्या या हालचालीमागील कारण शाकिब अल हसनच्या निवृत्तीच्या निर्णयाशी संबंधित असू शकते.
कानपूर कसोटी सुरू होण्यापूर्वी शाकिब अल हसनने निवृत्ती जाहीर केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव घरच्या मैदानावर तो सामना खेळू शकला नाही, तर कानपूर ही त्याची शेवटची कसोटी ठरू शकते, असे तो म्हणाला होता. आता साकिब पुढे काय पाऊल उचलणार ? बांगलादेशला जाऊन कसोटी खेळणार की नाही ? हे माहीत नाही पण शाकिब आता भारतात कसोटी खेळताना दिसणार नाही हे मात्र नक्की. त्याने आपली शेवटची कसोटी भारतीय भूमीवर खेळली आहे.
विराट कोहलीने शाकिबला दिली बॅट भेट
कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. हा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहलीने शाकिब अल हसनला त्याची बॅट भेट दिली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. विराटने त्याची सही केलेली बॅट शाकिबला भेट दिली.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शकिबची कामगिरी
शाकिब अल हसनने बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या 4 डावात 66 धावा केल्या, ज्यात 32 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गोलंदाजीत त्याने 4 बळी घेतले. ही मालिका साकिबसाठी कामगिरीच्या दृष्टीने तितकीशी चांगली नव्हती हे स्पष्ट आहे.
बांगलादेशविरुद्धची ही कसोटी मालिका विराट कोहलीसाठी चांगली गेली नाही. तसेच त्याने 4 डावात केवळ 100 धावा केल्या आहेत.