नवी दिल्ली : भारताची रनमशीन विराट कोहलीने विश्वचषकानंतर सर्वांनाच धक्का दिला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. पण, त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यास नकार दिला आहे. विराट कोहलीनेही बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर २६ डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले आहे की त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे आणि जेव्हा त्याला पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळावे वाटेल तेव्हा तो परत येईल. सध्या त्याने बीसीसीआयला सांगितले आहे की तो लाल बॉल क्रिकेट खेळणार आहे, म्हणजेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपस्थित राहणार आहे.