उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात साजरा झाला विश्व लेवा गणबोली दिन

जळगाव :  पद्य आणि गेय स्वरुपात लेवा गणबोली भाषेतून सादर झालेल्या कविता आणि या कवितांचा आशय हिंदी आणि इंग्रजीतून करण्यात आलेल्या अनुवादाला १० राज्यातील रासेयो शिबीरार्थींनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात खऱ्या अर्थाने विश्व लेवा गणबोली दिन साजरा झाला.

          भारत सरकारच्या क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय आणि रासेयो विभागीय संचालनालय, पुणे व  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्‍त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता शिबीर सुरु आहे. या शिबीरात शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी विश्व लेवा गणबोली दिन साजरा करण्यात आला.  यामध्ये लेवा गणबोलीचे माधुर्य या विषयावर प्रा.व.पु.होले यांचे व्याख्यान झाले व लेवा गणबोली कवी संमेलनात संध्याताई भोळे, संध्याताई महाजन, शीतलताई पाटील आणि अरविंद नारखेडे यांनी कविता सादर केल्या.  कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, अधिसभा सदस्य प्रा. ई.जी. नेहते, अमोल मराठे यांची यावेळी उपस्थिती होती.

          दहा राज्यातून आलेल्या दोनशे पेक्षा अधिक रासेयो शिबीरार्थींना लेवा गणबोलीची आणि पर्यायाने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ओळख व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.होले यांनी आपल्या भाषणात बोलीभाषेतून विचारांचे आदान प्रदान होते.  लेवा गणबोली ही ऐकायला गोड आहे पण वाचायला आणि लिहायला कठीण असली तरी या भाषेत सौंदर्य आणि गोडवा  आहे हे सोदाहरण स्पष्ट केले.  व्याख्यानानंतर कवी संमेलनात अरविंद नारखेडे यांनी म्हाई लेक  आणि म्हाया खानदेश या दोन कविता सादर केल्या.  संध्याताई महाजन यांनी गेय स्वरुपात लेवा गणबोली आणि माय बहिणाई या  कविता सादर केल्या.  संध्याताई पाटील यांनी माय  बहिणाई आणि हास्य कविता सादर केली तर शीतलताई पाटील यांनी माय भूमी आणि जिनगानीचा ईनोद या कविता सादर केल्या.  विद्यार्थी विकास संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी हिंदी व इंग्रजीतून या कविता आणि व्याख्यानाचा आशय खुमासदार शैलीत शिबीरार्थींना सांगितला तेव्हा शिबीरार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  जवळपास दोन तास हे व्याख्यान आणि कवी  संमेलन रंगले. प्रा.ई.जी. नेहेते यांनी अध्यक्षीय समारोप केला.  डॉ.दिनेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी आभार मानले.

          व्याख्यानानंतर या शिबीरात १५ विद्यापीठांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन देशातील समृध्द सांस्कृतिक परंपरेचे दर्शन दिले. यामध्ये संबलपूरी नृत्य, लावणी, पारंपरिक नाडोदी लोकनृत्य, पोवाडा, महाराष्ट्र गीत, भुरटा नृत्य, भरत नाटय, काल्बेनीया नृत्य, गणपती नृत्य, शिवरायांचा पाळणा, कन्नड गीत आणि राजस्थानी गीत यांचा समावेश होता.