---Advertisement---
जळगाव : विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस व विश्वकर्मा समाज युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील एकता, प्रगती आणि युवकांना प्रेरणा देणारा हा सोहळा उद्या बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हातनूर वसाहत हॉल, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव येथे पार पडणार आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश या संमेलनातून दिला जाणार आहे. कार्यक्रमात कारपेंटर बांधवांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून, भाग्यवान विजेत्यांना ड्रील मशीन व कटर मशीनचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमामुळे कारागीर वर्गाला नवे तंत्रज्ञान उपलब्ध होऊन स्वावलंबनाकडे वाटचाल सुलभ होणार आहे.
विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या पुढाकारातून आयोजित हा उपक्रम केवळ धार्मिक व सामाजिक सोहळा नसून, युवकांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रगतीची नवी संधी देणारा ठरणार आहे. या भव्य सोहळ्याला विश्वकर्मा समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, समाजाचे ऐक्य व सामूहिक बळ प्रदर्शित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “समाजाच्या ऐक्यानेच भविष्य उज्ज्वल घडते” हा संदेश घेऊन विश्वकर्मा समाजाचा हा भव्य सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.