विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी : गुढी पाडव्यापासून करता येणार विठ्ठलाची तुळशी पूजा !

तरुण भारत लाईव्ह न्युज : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरयेथील विठुरायाची तब्बल आठ वर्षांपासून तुळशी‌पूजा बंद होती. मात्र ही पुजा गुढीपाडव्यापासून पुन्हा सूरू होणार असून , येत्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल भक्तांना श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करता येणार आहे. त्याबाबतचा निर्णय नुकताच मंदिर समितीनेघेतला आहे.

भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा करण्यात येतात. या पुजांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच भाविकांच्या मागणीनुसार तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

ही पुजा यात्रा, सण, उत्सव इत्यादी दिवस वगळून इतर दिवशी दैनंदिन सकाळी महानैवेद्यापुर्वी, दुपारी पोषाखापूर्वी व सायंकाळी धुपारतीपूर्वी या वेळेत प्रत्येकी दहा प्रमाणे एकूण 30 पुजा उपलब्ध होणार आहेत.

त्यामध्ये एका पुजेसाठी जास्तीत जास्त 5 भाविकांना प्रवेश दिला जाणार असून प्रतिपुजेसाठी दाेन हजार शंभर रुपये इतकी देणगी मुल्य राहणार आहे. भाविकांनी‌ तुळशी पूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.